आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाच वर्षांनंतर रावेरला मिळणार पूर्णवेळ मुख्याधिकारी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रावेर - गेल्या पाच वर्षांपासून रावेर पालिकेचा पदभार प्रभारी मुख्याधिका-यांकडे असल्याने शहरातील विकासकामांना खीळ बसली होती. मात्र, पाचोरा येथून राहुल पाटील यांची रावेरला बदली झाली असून लवकरच ते पदभार स्वीकारणार आहेत.
पाटील यांच्या रूपाने पालिकेला पूर्णवेळ अधिकारी लाभणार आहे. त्यामुळे रखडलेल्या विकासकामांचा मार्ग मोकळा होणार आहे. राहुल पाटील यांनी पदभार स्वीकारल्यानंतर शहरवासीयांच्या सोयीसुविधांमध्ये वाढ होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. तत्कालीन मुख्याधिकारी व्ही.जी.नलावडे यांची कारकीर्द अनेक कारणांमुळे वादग्रस्त ठरली होती.
शहरातील छोरिया मार्केटच्या अतिक्रमणाचा वाद नलावडे यांच्या कारकिर्दीतच झाला होता. तसेच आजही हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. अतिक्रमणासह विकासकामांची रखडलेली गती व शहरातील अनेक भागांमध्ये निर्माण झालेल्या अस्वच्छतेची समस्या बिकट बनली होती. नलावडे यांच्यानंतर काहीकाळ फैजपूरचे मुख्याधिकारी अनिल वायकोळे यांनी तर काही काळ सावद्याचे मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांच्याकडे कारभार सोपवण्यात आला. मात्र, प्रभारी अधिका-यांमुळे पालिकेच्या कामावर परिणाम झाला होता. प्रभारी कामकाजामुळे कर्मचा-यांवर जबाबदार अधिका-यांचे नियंत्रण नसल्याने नागरिकांनाही अडचणीचा सामना करावा लागत होता. मात्र, पूर्णवेळ मुख्याधिका-यांच्या नियुक्तीमुळे समस्या सुटणार आहे.
कामांना मिळेल गती
पालिकेच्या रखडलेल्या कामांबाबत विभागवार बैठका घेऊन सूचना देण्याकडे मुख्याधिका-यांनी लक्ष पुरवावे. वीज, पाणीपुरवठा आणि स्वच्छतेच्या तक्रारी सोडवण्यासाठी अधिका-यांनी पाठपुरावा करावा. हद्दवाढ, मंगल कार्यालयाची उभारणी अशी कामे प्रस्तावित आहेत. पूर्णवेळ अधिका-यांमुळे शहरातील विकासकामांना गती मिळेल. पद्माकर महाजन, उपनगराध्यक्ष, रावेर

समस्या सुटणार
- पूर्णवेळ अधिका-यांअभावी शहरातील विकासकामांची गती मंदावली होती. तसेच नागरिकांनाही अडचणींचा सामना करावा लागत होता. मात्र, लवकरच ही समस्या सुटणार आहे. पालिकेला पूर्णवेळ मुख्याधिकारी मिळाल्याने नागरिकांच्या कामांना गती मिळेल. तसेच कर्मचा-यांना मार्गदर्शन मिळणार असल्याने तक्रारी मिटतील. अ‍ॅड.सुरज चौधरी, अध्यक्ष, रावेर, विकास युवाशक्ती फाउंडेशन