आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रवींद्र मिर्लेकर शिवसेनेचे संपर्कप्रमुख

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - सहा महिन्यांपासून रिक्त असलेल्या शिवसेनेच्या जिल्हा संपर्क प्रमुखपदी रवींद्र मिर्लेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मिर्लेकरांनी चाचपणी केल्यानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे स्वत: जळगाव महानगरप्रमुखाची घोषणा करणार आहेत.

जळगाव जिल्हा शिवसेनेचे संपर्क प्रमुख विलास अवचट यांची प्रकृती खराब असल्याने ते सहा महिन्यांपासून जळगाव जिल्ह्याच्या दौर्‍यावर आलेले नाहीत. अवचट यांच्या आजारपणामुळे गेल्या कित्येक दिवसांपासून संपर्क कमी झाला होता. परंतु औरंगाबाद येथे विभागीय मेळाव्याच्या निमित्ताने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आलेले असताना शिवसेना जिल्हाप्रमुख किशोर पाटील व चंद्रकांत पाटील यांनी त्यांची भेट घेतली. या वेळी जिल्ह्यातील संघटनांसंदर्भात चर्चा करण्यात आली. आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवत संपर्क प्रमुखांची नियुक्ती करावी, अशी विनंती करण्यात आली. गेल्या सहा महिन्यापासून जिल्ह्याच्या संदर्भात बाजू मांडण्यासाठी थेट जिल्ह्यातील पदाधिकार्‍यांनाच ठाकरेंची भेट घ्यावी लागत असल्याने ठाकरेंनी त्याचठिकाणी जिल्ह्याचे संपर्क प्रमुख पदाची जबाबदारी रवींद्र मिर्लेकर यांच्यावर सोपवली. मिर्लेकर यांच्याकडे दादर लोकसभा, परभणी, नाशिक व आता जळगाव जिल्ह्याची जबाबदारी आली आहे. यापूर्वीही मिर्लेकर यांनी जळगाव जिल्ह्यात चार ते पाच महिने संपर्क प्रमुखपदी काम पाहिले होते. येत्या चार, पाच दिवसांत मिर्लेकर जळगाव दौर्‍यावर येणार असून त्याचवेळी ते महानगराध्यक्षपदासाठी चाचपणी करणार आहेत. त्यानंतर पक्षप्रमुख ठाकरे हे जिल्हा दौर्‍यावर येऊन जळगाव शहराध्यक्षाची घोषणा करतील.

महानगराध्यक्ष निवडही लवकरच
औरंगाबादच्या मेळाव्यात पक्षप्रमुखाशी चर्चा झाली. संपर्क प्रमुख म्हणून रवींद्र मिर्लेकर यांना जबाबदारी दिली आहे. महानगराध्यक्षाची निवडही लवकरच होईल. असे शिवसेना जिल्हाप्रमुख किशोर पाटील यांनी सांगितले.