आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिवाळी सुटीत ‘प्रेरणादायी’ पुस्तके वाचण्यावर भर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- दिवाळीच्या सुटीत वेगवेगळय़ा प्रकारचे साहित्य वाचनाला बच्चे कंपनीपासून ते थेट ज्येष्ठांनी प्राधान्य दिले. यात प्रेरणादायी आणि व्यक्तिमत्त्व विकासाच्या पुस्तकांना अधिकमागणी दिसून आली. एवढेच नव्हे तर वाचनालयातही वाचकांची संख्या वाढली आहे.

‘वाचाल तर वाचाल’ याचा अर्थ हळूहळू कळू लागला आहे. त्यामुळे वाचनालयांत, पुस्तक प्रदर्शनात वाचकांची गर्दी वाढू लागली आहे. यंदा दिवाळीच्या सुटीत वेगवेगळय़ा लेखकांचे साहित्य वाचनात वाचकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. यात प्रेरणा देणार्‍या पुस्तकांना अलीकडे मागणी वाढली आहे. गेल्या काही वर्षांपासून व्यक्तिमत्त्व विकासाच्या पुस्तकांना मोठी मागणी आहे. ती दिवाळी सुटीतही कायम होती. तसेच ठरलेल्या लेखकांच्या साहित्य खरेदीला नेहमीप्रमाणे प्रतिसाद मिळाला. ‘असा घडला भारत’ या नुकत्याच प्रकाशित झालेल्या पुस्तकालाही चांगली मागणी होती. प्रतिष्ठित साहित्यिकांच्या साहित्याला मागणी कायम होती.

साहित्यवाचकांची संख्या वाढली
दिवाळीच्या सुटीत बालसाहित्यिकांची संख्या ‘जैसे थे’ दिसून आली; पण इतर साहित्य वाचकांच्या संख्येत काही प्रमाणात वाढ झाली आहे. कादंबरी, कथासंग्रह, कविता संग्रहाला मागणी होती. स्पर्धा परीक्षा, व्यक्तिमत्त्व विकासावर आधारित पुस्तकांना अलीकडे मागणी वाढली आहे. दिवाळीतही या पुस्तकांची विचारणा पुस्तक विक्रेते आणि ग्रंथालयांकडून करण्यात आली.

दिवाळी अंकांनाही वाढता प्रतिसाद
दिवाळी अंकासाठीदेखील वाचकांची मागणी होती. व.वा. ग्रंथालयातर्फे सवलतीच्या दरात दिवाळी अंक वाचकांसाठी उपलब्ध करून दिले आहेत. दरवर्षाप्रमाणे ठरलेले दिवाळी अंक दिवाळीच्या दिवशीच बाजारात आले. पण हे अंक खरेदीला दिवाळीनंतर प्रतिसाद वाढला.

दिवाळी अंक योजनेला प्रतिसाद
दिवाळीत नेहमीप्रमाणे प्रतिष्ठित लेखकांच्या साहित्याला मागणी आहे. यंदा सर्वाधिक प्रेरणादायक, व्यक्तिमत्त्व विकासावर आधारित पुस्तकांनाही मागणी होती. दिवाळीनंतर खरेदीचा ओघ वाढतो. तो डिसेंबरपर्यंत सुरू असेल. सुबोध नेवे, शारदा बुक डेपो

दिवाळीच्या सुटीमुळे वाचनालयात पुस्तकांची मागणी वाढली आहे. वाचकांच्या गरजेनुसार पुस्तके उपलब्ध करून दिली आहेत. त्याचप्रमाणे दिवाळी अंक योजनाही उपलब्ध करून दिली आहे. तिला मोठा प्रतिसाद आहे. अनिल अत्रे, ग्रंथपाल, व. वा.वाचनालय

दिवाळीत सुटी असल्याने वेळेचा सदुपयोग वेगवेगळे साहित्य वाचनासाठी करतो. त्यामुळे वाचनालय, प्रदर्शनातून नवे पुस्तक शोधण्याचा प्रयत्‍न करतो. संजय त्रिपाठी, वाचक