आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘रिअल इस्टेट’ क्षेत्रात ८० कोेटींची उलाढाल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भुसावळ - केंद्रीय कर्मचाऱ्यांना मिळालेला सातवा वेतन आयोग, दोन टक्के महागाई भत्ता तसेच शहरात उपलब्ध असलेल्या शैक्षणिक सुविधांमुळे यंदाच्या दिवाळीत शहरातील रिअल इस्टेट उद्योगाला झळाळी मिळाली आहे. यंदाच्या दिवाळीत शहरात तब्बल ४०० घरांचे बुकिंग झाले असूून, यातून ८० ते १०० कोटींची उलाढाल होणार आहे.
जळगावनंतर जिल्ह्यातील सर्वात मोठे शहर म्हणून भुुसावळचा उल्लेख होतो. नाशिक विभागातील एकमेव ‘अ’ वर्ग नगरपालिका आणि आगामी काळात जिल्ह्याचा महसुली दर्जा मिळू शकण्याची संधी आहे. यासह शहरात केंद्रीय कर्मचाऱ्यांचे प्रमाण अधिक असून, परिसरातील यावल, रावेर, मुक्ताईनगर, बोदवड, वरणगाव येथून पाल्यांच्या शिक्षणासाठी भुसावळात स्थायिक होणाऱ्या शेतकऱ्यांचे प्रमाणही अधिक आहे. यामुळे शहरातील रिअल इस्टेट क्षेत्राला सध्या सोनेरी दिवस आले आहेत. यंदाच्या दिवाळीत शहर आणि परिसरातील किमान ४०० घरांचे बुकिंग झाले असून, यातून या क्षेत्रात ८० ते १०० कोटींची उलाढाल होणार आहे. भुसावळ तालुक्यात रेल्वे, आरएमएस, दोन आयुध निर्माणी, दीपनगरातील औष्णिक वीजनिर्मिती केंद्रामुळे कामगारांचे प्रमाण अधिक आहे. यासह एमआयडीसी विकसित होत असल्याने रोजगाराच्या संधी अधिक आहेत. रेल्वेमुळे दळणवळणाची चांगली सुविधा उपलब्ध असल्याने कोणत्याही वेळी देशातील कानाकोपऱ्यात जाण्याची सुविधा आहे. यामुळे शहरात हक्काचे घर असावे, अशी मानसिकता वाढत आहे. बहुतांश केंद्रीय कर्मचाऱ्यांनी नाशिक, जळगाव आणि पुण्यात घरे घेतली असली तरी शहरातही हक्काचे घर असावे, अशी मानसिकता असल्याने शहरातील हक्काच्या घरांचे बुकिंग वाढत आहे.

घरांच्या किमती स्थिर : शहरातीलभूखंडांच्या किमती सध्या स्थिर आहेत. गेल्या दहा वर्षांपूर्वी असलेल्या भावाच्या तुलनेत त्या वाढल्या नाहीत. तसेच सध्या बांधकाम साहित्याचे दरही घसरले असल्याने तयार घरांच्या किमतीही आवाक्यात आहेत. गेल्या वर्षाप्रमाणे किमती स्थिर असून, वाढीचे संकेत अाहेत.

सवलतीचा लाभ
राष्ट्रीय कृतबँका तसेच वित्तीय संस्थांनी सहा लाख उत्पन्न गट असलेल्या कुटुंबांना व्याजदरात मोठी सवलत दिली आहे. यामुळे या योजनेतून गृहकर्ज घेऊन घर खरेदी होत आहे. तसेच एप्रिल २०१७पासून जीएसटी लागू होणार असल्याची शक्यता असल्याने, बांधकाम क्षेत्रात दरवाढ होण्याची भीती असल्याने आताच गुंतवणूक फायदेशीर ठरणार असल्याचाही मतप्रवाह आहे.

गुंतवणुकीचा पर्याय
केंद्रीय कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाचा लाभ मिळाला अाहे. यासह दोन टक्के महागाई भत्ताही मिळणार असल्याने वेतनात मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे. यामुळेे गृहकर्ज घेऊन हक्काचे घर घेण्यासाठी आता तृतीय आणि चतुर्थश्रेणी कर्मचारी सरसावले आहेत. यामुळे आयुध निर्माणी, रेल्वे, आरएमएस कर्मचाऱ्यांनी शहरातील विविध भागांत गुंतवणूक सुरू केली आहे.
बातम्या आणखी आहेत...