आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रस्ता दुरुस्तीचे शास्त्रच खड्डय़ात

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- पाऊस आला की रस्ते खराब होतातच, असा जणू नियम बनून गेला आहे; पण रस्ते खराब पावसामुळे नाही तर त्यांच्या निर्मितीचा दर्जा निकृष्ट असल्यामुळे आणि दुरुस्तीसाठी शास्त्रीय पद्धत वापरली जात नसल्यामुळे खराब होतात हे तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे. शहरातील खड्डय़ांची गंभीर अवस्था उजेडात आणल्यानंतर ‘दिव्य मराठी’ने या अवस्थेच्या कारणांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. त्या वेळी या खड्डय़ांच्या खोलात दडलेली सत्यता समोर आली.

खड्डे का पडतात?
0 रस्ता दुरुस्त करताना त्यातील खड्डे योग्य पद्धतीने भरून त्याच्या कडा व्यवस्थित बंद केल्या नसल्यास त्यावर पाणी साचल्याने हळूहळू खड्डा तयार होतो.
0 खडी व डांबर यांचे मिर्शण तयार करताना दोन्ही वस्तूंचे प्रमाण अयोग्य असल्यास खडी सैल होऊन खड्डा तयार होतो.
0 रस्ता तयार करताना पृष्ठभाग (बेस) पुरेसा टणक न झाल्यास खड्डे लवकर पडतात.
0 रस्त्यावरील पाणी वाहून जाण्यासाठी दोन्ही बाजूला गटार नसल्यास रस्त्यावर पाणी तुंबुन डांबर आणि खडी ठिसूळ होते.
0 अति पाऊस व संततधारेमुळे खडी व डांबर यांची पकड सैल होऊन माती वर येते. त्यामुळे खड्डे वाढत जातात.

पुन्हा पुन्हा का होतात खड्डे?
बहुतेक मक्तेदार हे एकाच प्रकारची डांबर मिश्रीत खडी खड्डय़ात ओततात. खड्डे भरण्यासाठी एकाच प्रकारची, एकाच आकाराची खडी वापरतात. खड्डा भरण्यापूर्वी खड्डय़ाच्या आजूबाजूला खोदतही नाहीत किंवा साफसफाईही करत नाहीत. तसेच खड्डा बुजविल्यानंतर त्याचा तत्काळ वापर सुरू होतो. त्यामुळे पुन्हा खड्डा तयार होतो.

खड्डे बुजविणारे यंत्र
रस्त्यावरील खड्डे बुजवण्यासाठी महापालिकेकडे ‘स्पॉट व्होल्ड फिलिंग मशीन’ अर्थात खड्डे बुजविणारे यंत्र आहे. योग्य तापमानावेळी या यंत्रात डांबर आणि अन्य माल टाकून खड्डे बुजवले जातात. पावसाळ्यात मात्र या यंत्राचा फारसा उपयोग होत नाही. यंत्राद्वारे खड्डा बुजवताना आधी तो थोडा खोल केला जातो. त्यानंतर नॉर्मल वातावरणात खड्डय़ांमध्ये मटेरिअल टाकून ते दाबले जाते. त्यानंतर तासाभरात तो रस्ता वापरण्यासाठी तयार होतो.

पॅचअप महत्त्वाचे
रस्ता तयार करताना पॅचअप योग्य प्रकारे झाले पाहिजे. डांबर व खडीचे मिश्रणही योग्य प्रमाणात असल्यास रस्ते दीर्घकाळ टिकतात. बेस प्रॉपर नसल्यास रस्ते अधिक दिवस टिकत नाहीत. प्रा. पराग पाटील, स्थापत्य अभियांत्रिकी विभाग

जागा टणक करणे गरजेचे
कोणतेही रस्ते बनवण्यासाठी सर्वात महत्त्वाची असते ती माती. ज्या भागावर रस्ते तयार करायचे असतात तेथे माती भुसभुशीत नसावी. ती कडक खडकाळ असायला हवी. नसल्यास त्यावर खडी व मुरूम टाकून त्यावर पाणी मारून वारंवार रोलर फिरवून ती जागा कडक केली पाहिजे. त्यानंतरच त्यावर डांबरीकरण केल्यास तो रस्ता अधिक काळ टिकू शकतो. अन्यथा रस्ता वारंवार खराब होतो.

खड्डे बुजविण्याची शास्त्रीय पद्धत
ज्या ठिकाणी रस्त्याला खड्डा पडलेला असेल त्याच्या अवतीभवती किमान सहा इंच चौकोनी खोदून घ्यावे. पडलेल्या खड्डय़ांच्या आतील माती, धूळ तारेच्या ब्रशने साफ करावी, चौकोनी खोदलेल्या खड्डय़ात पातळ डांबराचा थर टाकावा. त्यावर डांबरमिश्रीत जाड खडी टाकावी. त्यावर बारीक खडी डांबराचे मिश्रण टाकावे. सर्वात वर कचखडी मिश्रीत डांबराचा थर असावा. या खड्डय़ातील मटेरिअलची पातळी रस्त्याच्या थोडी वर आल्यावर त्यावरून रोडरोलर फिरवून दाब द्यावा. त्यानंतर एक तासाने हा रस्ता वापरण्यास योग्य होतो.