आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Recorded Statement Of Pradeep Raisony In Gharkul Scam

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

प्रदीप रायसोनी यांनी पोलिसांना दिलेला जबाब त्यांच्याच शब्दात

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

घरकुलासाठी हुडकोकडून कर्ज मंजुरीसाठी सुरेश जैन यांच्या सांगण्यानुसार मी नगरपालिका अध्यक्ष व मुख्याधिकार्‍यांना हाताशी धरून त्याप्रमाणे नऊ ठिकाणांसाठी जागा ताब्यात नसतानाही योजना तयार करून घेतली व हुडकोकडून कर्जाची मागणी केली. सदर योजना अंमलात आणण्यासाठी सुरेश जैन हे वेळोवेळी मार्गदर्शन करू लागले. नगरपालिकेत मानधनावर नियुक्त असलेला कर्मचारी तांत्रिक सल्लागार रामेश्वर शर्मा यास प्रथम चार ठिकाणी घरकुल योजना राबविण्यासाठी आर्किटेक्ट नेमण्याबाबतचा प्रस्ताव तयार करण्यास सुरेश जैन यांच्या सांगण्यावरून सांगितले. त्यानंतर नगरपालिकेचे अधिकारी व जागा नगरपालिकेच्या नावावर नसल्यामुळे तसेच सदर कामास तांत्रिक मान्यता नसल्यामुळे निविदा विक्रीची जाहिरात काढण्यास तयार नव्हते. तेव्हाही सुरेश जैन यांनी, मी त्या जागा आपल्याला लवकर मिळवून देतो, असे सांगितले व नगराध्यक्षा सिंधुताई कोल्हे यांना जाहिरात प्रसिद्ध करण्याचे आदेश दिले. त्याप्रमाणे घरकुल बांधकामाबाबत दोन वेळा वेगवेगळ्या ठिकाणांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली.

निविदा प्रसिद्ध झाल्यानंतर सदर बांधकामाचा कालावधी हा सुद्धा सुरेश जैन यांच्या सांगण्यावरून 2 व 3 वर्षांवरून नऊ महिने इतका कमी केला असून आपण त्याप्रमाणे सिंधू कोल्हे यांना सर्व कामांचा कालावधी सुरेश जैन यांच्या सांगण्यावरून कमी करण्यास सांगितले होते. त्यावरून त्यांनी सदर कामांचा कालावधी कमी केला होता. सुरेश जैन यांनी आपल्या मंत्रिपदाचा वापर करून कर्ज मंजूर करून घेतले व कर्जाचा पहिला हप्ता नगरपालिकेस प्राप्त झाला. त्यानंतर घरकुल बांधकामाची निविदा प्रक्रिया तातडीने पार पाडून सर्व नऊ ठिकाणाच्या घरकुल बांधकामाचा ठेका खान्देश बिल्डरला देण्यात आला. खान्देश बिल्डर्स यास मोबिलायझेशन अँडव्हान्स मंजूर करण्यापूर्वी मी व नगरपालिका इंजिनिअर खडके याने राजेंद्र मयूर यास त्याचे राजा ट्रॅक्टर्स कार्यालयात जावून मोबिलायझेशन अँडव्हान्स देता येणार नाही, असे सांगितले होते. परंतु राजेंद्र मयूर याने सुरेशदादांनी अँडव्हान्स देण्यास सांगितले आहे, असे सांगितले व आम्हा दोघांनाही सुरेश जैन यांची भेट घेण्यासाठी बंगल्यावर बोलावल्याचे सांगितले. मी व खडके सुरेश जैन यांचे बंगल्यावर गेलो व त्यांनाही मोबिलायझेशन अँडव्हान्सबाबतचा जीआर दाखविला असता त्यांनी तुम्हाला सांगतो तसे करा बाकी मी पाहून घेईन, असे सांगितले.

त्यानंतर मी जगन्नाथ नथ्थू वाणी यांच्या नेहरू चौक येथील खान्देश बिल्डर्सच्या ऑफिसमध्ये गेलो व तेथे जगन्नाथ वाणी याने मला सुरेश जैन यांनी दिलेल्या अटींवर वर्क ऑर्डर देण्यास सांगितले आहे, असे सांगितले. त्यावरून मी सहायक अभियंता खडके यास बोलावून ठेकेदार खान्देश बिल्डर्स याचे अटी व शर्ती मंजूर केल्याचे पत्र व वर्क ऑर्डर तेथेच जगन्नाथ वाणी यांच्याकडे असलेल्या टाइपराइटरवर तयार करून मुख्याधिकारी काळे यास बोलावून सह्या घेतल्या व त्याचदिवशी वर्क ऑर्डर दिली. तसेच कागदोपत्री खान्देश बिल्डर्सचा प्रतिनिधी ईश्वर चौधरी यांचेसोबत वाटाघाटी करून कामाचा ठेका देण्यात आल्याचे दर्शविले व खान्देश बिल्डर्सच्या सर्व अटी सुरेश जैन यांच्या सांगण्याप्रमाणे मान्य केल्या. खान्देश बिल्डरला सदर कामाचा ठेका दिल्यानंतर वाटाघाटीत ठरल्याप्रमाणे मोबिलायझेशन अँडव्हान्सही देण्यात आला. खान्देश बिल्डर्सचे संचालक जगन्नाथ नथ्थू वाणी व राजेंद्र अनिल मयूर हे सुरेश जैन यांचे निकटचे मित्र आहेत. खान्देश बिल्डर्सचे रजिस्टर्ड ऑफिस सुरेश जैन यांचे निवासस्थानी 7, शिवाजीनगर, जळगाव येथे होते. ठेकेदार खान्देश बिल्डर यास अवाजवी सवलती देऊन कामाचा ठेका देण्यात आला होता. तसेच त्या व्यतिरिक्तही आणखी सवलती देण्यात आल्या.

हुडकोकडून पहिला हप्ता मंजूर होऊन प्राप्त झाल्यानंतर त्यातील रक्कम रुपये 11.56 कोटी रुपये मोबिलायझेशन अँडव्हान्स म्हणून ठेकेदार खान्देश बिल्डर्स यांना देण्यात आला. त्यानंतर सप्टेंबर 1999 मध्ये मला सुरेश जैन यांनी नाना वाणी व राजा मयूर यांच्यासमक्ष त्यांच्या बंगल्यावर बोलावून कामाच्या प्रगतीबाबत सहा. अभियंता खडके व मुख्याधिकारी काळे यांचेकडून कामाची प्रगती झाली असल्याबाबत व कामावर खर्च झाला असल्याचा खोटा रिपोर्ट तयार करून कर्जाचा दुसरा हप्ता हुडकोकडून मंजूर करून घेण्यास सांगितले. त्याप्रमाणे मी मुख्याधिकारी काळे व अभियंता खडके यांना सांगून हुडकोस कामाचया प्रगतीबाबत खोटा रिपोर्ट तयार करून हुडकोस पाठविण्यास सांगितले.

सुरेश जैन व खान्देश बिल्डर्स मिळून घरकुल बांधकामासाठी हुडकोकडून घेतलेल्या कर्ज रकमेमध्ये घरकुल बांधकामाच्या नावाखाली अपहार करीत आहेत हे मला समजत होते; परंतु जळगाव नगरपालिकेत असलेली सुरेश जैन यांची सत्ता, त्यामुळे मी त्याबाबत काहीही करू शकत नव्हतो. जळगाव नगरपालिका व महानगरपालिकेचा कारभार मी नेहमी सुरेश जैन यांच्या सांगण्याप्रमाणे केला आहे. सदर कालावधीत नगरपालिकेत झालेल्या अपहाराबाबत सर्वांना माहिती होती व विरोधी पक्षातील नगरसेवक मुख्यत: नरेंद्र भास्कर पाटील हे वेळोवेळी विरोध करीत होते. तसेच सदर काम हे अवैधपणे व बेकायदेशीरपणे चालू असल्याचे व त्यामध्ये अपहार करीत असल्याचे सर्वसाधारण सभेत सांगत होते व घरकुल बांधकामास विरोध करीत होते. परंतु कोणीही त्याकडे लक्ष देत नव्हते. जे नगरसेवक विरोध करीत होते त्यांना नगरपालिका सभेत बोलू दिले जात नसे. ते बोलण्यास उभे राहिले तर त्यांना इतर नगरसेवक मोठमोठय़ाने ओरडत असत. तसेच बाके वाजवून त्यात अडथळा आणीत असत. त्यामुळे विरोध करणारे नगरसेवक काय बोलत आहेत हे कोणालाही समजत नव्हते.

घरकुल बांधकामासाठी सुरुवातीला निविदा प्रक्रिया राबविताना कर्ज प्रक्रिया लवकर व्हावी म्हणून नगरपालिकेच्या ताब्यात नसलेल्या किंवा नावावर असलेल्या, तसेच काही खासगी मालकीच्या असलेल्या जागांवर योजना तयार करण्यात आली. त्याबाबत वेळोवेळी अधिकार्‍यांनी आक्षेप घेऊनही त्याकडे दुर्लक्ष करून कर्जाचा पहिला हप्ता मंजूर करून घेण्यात आला. त्यानंतर सदर जागा ताब्यात घेण्यास अडचणी येत असल्याचे भासविण्यात आले व सुरेश जैन यांचे सांगण्याप्रमाणे पिंप्राळा शिवारात घरकुल बांधकामासाठी शेतकर्‍यांच्या जमिनी विकत घेण्याचे ठरले. तेव्हा जमीनधारक शेतकर्‍यांना सुरेश जैन यांच्या बंगल्यावर बोलावून त्यांच्याशी सुरेश जैन व मी वाटाघाटी केल्या. जमिनींची किंमत ठरविली. त्याप्रमाणे नगररचना विभागाने ठरलेल्या किमतीस मंजुरी दिली. सन 2001 मध्ये सुरेश जैन यांनी मला जळगाव नगरपालिकेचे सर्व आर्थिक व्यवहार हे त्यांच्या मार्गदर्शनाखाली होतील, अशी जाहिरात प्रसिद्ध करण्याचे सांगितले. त्यावरून मी तत्कालीन नगराध्यक्ष लक्ष्मीकांत चौधरी यास सुरेश जैन यांच्या म्हणण्याप्रमाणे जाहिरात प्रसिद्ध करण्यास सांगितले. त्याप्रमाणे नगराध्यक्ष लक्ष्मीकांत चौधरी यांनी तशी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. खान्देश बिल्डर्सचे संचालक राजा मयूर व जगन्नाथ वाणी हे सुरेश जैन यांचे बालपणापासूनचे मित्र असून अत्यंत निकटवर्तीय आहेत. तसेच खान्देश बिल्डर्सचे डायरेक्टर जरी वाणी व मयूर असले तरी खान्देश बिल्डर्स ही सुरेश जैन यांचीच कंपनी आहे व खान्देश बिल्डर्सला मिळणारा फायदा हा सुरेश जैन यांनाच मिळत होता.

नगरपालिकेत मी सुरेश जैन यांच्या वतीने व आदेशाने जे निर्णय घेत होतो त्याला नगरपालिकेतील कोणीही नगरसेवक विरोध करीत नव्हता. कारण इतर नगरसेवकांना नातेवाइकांच्या किंवा मित्रांच्या नावावर नगरपालिकेच्या कामांचे ठेके मिळत होते किंवा त्यांना रोख रक्कमही दिली जात होती. तसेच सदर कालावधीत नगराध्यक्ष म्हणून निवडले गेलेल्या सदस्यांना इतरही फायदे दिले जाते होते. तसेच एक सामाजिक उच्च दर्जा मिळत होता, त्यामुळे याबाबत कोणीही विरोध करीत नव्हते. सदर घरकुल बांधकाम प्रकल्पामध्ये वेळोवेळी नगरपालिका अधिकारी, मुख्याधिकारी यांनी बेकायदेशीर निर्णयांना हरकती घेत असल्याचे भासविले परंतु सदर बेकायदेशीर आदेशांची, ठरावांची अंमलबजावणी केली. त्यामुळे सदर घरकुल बांधकामामध्ये अपहार झाला आहे. नगरपालिका मुख्याधिकारी यांनी जर आपले कर्तव्य कायदेशीर व पूर्णपणे पार पाडले असते तर सदर घरकुल बांधकामामध्ये अपहार झाला नसता. नगरपालिकेतील नगराध्यक्ष, नगरसेवक, मुख्याधिकारी तसेच इतर अधिकार्‍यांना मी वेळावेळी दिलेले सर्व आदेश हे सुरेश जैन यांच्या सांगण्यावरून दिले आहेत.

माझा वरील जबाब मी स्वखुशीने दिला असून त्यासाठी माझेवर कुठलेही दडपण आणलेले नाही किंवा आमिष दाखविण्यात आले नाही. मी स्वखुशीने मा. न्यायालयासमोरही आपला जबाब नोंदविण्यास तयार आहे. हाच माझा जबाब असून तो मी वाचून माझे सांगणेप्रमाणे बरोबर व सत्य आहे.