आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लाचखाेराच्या शिक्षेसाठी रेकॉर्डिंगचा पुरावा ग्राह्य

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धुळे - चारशे रुपयांच्या लाचेची मागणी करणाऱ्या शिरपूर पोलिस ठाण्यातील कॉन्स्टेबल कुलदीप सपकाळ याला धुळे न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा ठोठावली. न्या.बी.डी.कापडणीस यांनी हा निकाल दिला. मोबाइल रेकॉर्डिंग आणि तक्रारदार तरुणाच्या मित्राची साक्ष शिक्षेसाठी ठोस पुरावा ठरली.

शिरपूरला महाविद्यालयीन शिक्षण घेत असलेले छत्रपालसिंग राजेंद्रसिंग राजपूत नीलेश सुरेश पाटील हे दोघे रात्री उशिरापर्यंत अभ्यास करायचे. दाेघे जण २३ एप्रिल २०१४ रोजी त्यांचा मित्र दिनेश कर्तारसिंह जाधव याच्या मोटारसायकलने चहा घेण्यासाठी िशरपूर फाट्यापर्यंत आले होते. मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास परत जात असताना त्यांना कुलदीप ज्ञानेश्वर सपकाळ याने अडवले. तसेच मोटार वाहन कायद्याखाली केस करण्यासाठी त्याने त्यांच्याकडून ५०० रुपयांची मागणी केली. त्यामुळे दुसऱ्या दिवशी छत्रपालसिंग याने धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली. त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी पडताळणीसाठी छत्रपालसिंगचामित्र स्वप्निल जाधव याला पोलिस ठाण्यात पाठवले. या पडताळणीतून कुलदीपने तडजोडीअंती ४०० रुपयांची मागणी केल्याची खात्री केली.
मोबाइलच्या रेकॉर्डिंमधील संभाषणाप्रमाणे ही मागणी झाली होती. त्यामुळे लाचलुचपत प्रतिबंधक कायदा कलम ७अन्वये कुलदीप सपकाळविरुद्ध दोषारोपपत्र दाखल हाेऊन धुळे न्यायालयात जिल्हा सत्र न्यायाधीश बी.डी.कापडणीस यांच्या समक्ष या खटल्याचे कामकाज झाले. सरकार पक्षाच्या वतीने सरकारी वकील मल्हारराव देशपांडे यांनी बाजू मांडली. उपलब्ध पुरावे, संदर्भ युक्तिवादावरून न्या.कापडणीस यांनी कुलदीपला दोषी ठरवून दोन वर्षे शिक्षा ४० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.

शिरपूरते सांताक्रुझ : शिरपूरपोलिस ठाण्यातील सपकाळ याला ताब्यात घेतल्यानंतर त्याच्या अावाजाचा नमुना घेण्यात आला. त्यानंतर आवाजाचा हा नमुना लाचेच्या मागणीसाठी झालेले संभाषण दोन मेमरी कार्डमधून सांताक्रुझमधील कलिना येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले. दोघांमधील आवाज एकाच व्यक्तीचा असल्याचा निर्वाळा तज्ज्ञांनी दिला. न्यायालयात हा अहवालही सादर करण्यात आला.

एसपींची देखील साक्ष :या खटल्यात तत्कालीन पोलिस अधीक्षक प्रदीप देशपांडे, तक्रारदार छत्रपालसिंग राजपूत, पंच ज्ञानेश्वर डहाके लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधिकारी विजय चौरे यांची साक्ष झाली. कुलदीपचे लग्न जवळ येऊन ठेपले असतानाच ही कारवाई झाली.
बातम्या आणखी आहेत...