आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Recruitment Scam In Jalgaon District Co Operative Bank

‘भरती’च्या तव्यावर राजकीय पोळय़ा, निवडणुका डोळ्यासमोर ठेवून संचालकांची खेळी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- अलीकडेच आर्थिकदृष्ट्या सुस्थितीत आलेली जिल्हा बॅँक सध्या सत्तेच्या राजकारणात ‘मध्यवर्ती’ झाली आहे. आधी मालमत्तेची विक्री आणि आता कर्मचारी भरतीवरून शेतकर्‍यांच्या या बॅँकेची प्रतिमा ‘अलिबाबाची गुहा’ असल्यासारखी झाली आहे.

राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाच्या पाच आमदारांसह सहकारमंत्र्यांकडे कर्मचारी भरतीप्रकरणी बॅंकेचे अध्यक्ष आमदार चिमणराव पाटील यांच्याविरुद्ध तक्रार घेऊन जाणारे माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर बंधार्‍यांच्या प्रश्नाबाबत त्याच चिमणराव पाटलांसोबत उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट घेण्यासाठीही गेले होते. राजकीय हाडवैर असलेल्या खासदार ईश्वरलाल जैन यांचे उमेदवार असलेल्या चिमणरावांच्या पाठीशी एकनाथ खडसेही भक्कमपणे उभे आहेत. बॅँकेतील सद्य:स्थितीवर मनोमन नाराज असूनही खासदार जैन यांच्याकडून मात्र सारे काही सुरळीत असल्याचा दावा केला जातो आहे.

कर्मचारी भरती प्रकरणात विरोधाचा शंख फुंकणार्‍या राष्ट्रवादीच्या संचालकांनी त्यांच्याच पक्षाचे असलेल्या पालकमंत्री संजय सावकारे यांना हक्काचे पीककर्ज नाकारूनदेखील जिल्हा बॅँकेच्या अध्यक्षांविरोधात ‘ब्र’देखील काढलेला नाही, ही वस्तुस्थिती आहे.

वरिष्ठ नेते असलेल्या बॅंकेच्या संचालकांच्या अशा सोईस्कर भूमिकेमुळे बुचकळ्यात पडलेल्या दोन्ही गटांच्या दुसर्‍या फळीतील संचालकांनी आता उघड भूमिका घेतली आहे. संचालक मंडळाची मुदत संपण्यास अवघे दोन महिने उरले असल्याने स्वत:चे अस्तित्व सिद्ध करण्याकरिता काही संचालकांनी मोहीम उघडली आहे. तर आगामी काळात किमान बॅँकेतील संचालकपद तरी टिकून राहावे म्हणून सोईस्कर भूमिका घेऊन काही संचालकांनी बचावात्मक पवित्रा घेतला आहे.

जिल्हा बॅँकेच्या संचालक मंडळाची निवडणूक समोर असतानाच लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकाही जवळ आल्या आहेत. त्यामुळे बॅँकेतील संचालकांच्या भूमिकेमागे भविष्यातील राजकीय समीकरणे आहेत. उदाहरणार्थ, भाऊबंदकीचा वाद असलेल्या शिवसेनेकडून लोकसभेसाठी मदत व्हावी म्हणून एकनाथ खडसे हे चिमणराव पाटील यांच्या पाठीशी आहेत. आमदार मनीष जैन लोकसभेसाठी अपक्ष राहिल्यास चिमणराव मदत करतील, अशी खासदार जैन यांना आशा आहे. अविश्वास आणण्यासाठी पुढाकार घेतला तर डॉ.सतीश पाटील यांची नाराजी दूर होऊन त्याचा फायदा गुलाबराव देवकरांना होणार आहे.

लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी जिल्हा बॅँकेची निवडणूक झाल्यास वरिष्ठांकडून अपेक्षित जागेसाठी मूठ सोडवून घेण्यासाठी दुसर्‍या फळीतील संचालक प्रयत्नशील आहेत. लोकसभेनंतर बॅँकेची निवडणूक झाल्यास बड्या संचालकांकडून काही संचालकांचा राजकीय बंदोबस्त होऊ शकतो; मात्र असे होऊ नये म्हणून लोकसभेसाठी मदत करण्याच्या मोबदल्यात बॅँकेत पुनर्वसन करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तथापि, भविष्यातील राजकीय अंदाज घेऊन आताच नेता आणि गट निश्चित करण्याची रंगीत तालीम जिल्हा बॅँकेच्या या संचालकांकडून सुरू झालेली आहे. त्यामुळे कर्मचारी भरती प्रकरण हे केवळ निमित्त आहे की काय? असादेखील प्रश्‍न उपस्थित केला जात आहे.