आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लाल मिरचीचे दर यंदा निम्म्याहून कमी; सर्वसामान्यांना दिलासा

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - बाजारपेठेत सर्वच गोष्टींचे दर वाढत असल्याने हैराण झालेल्या गृहिणींना लाल मिरची यंदा दिलासा देणार आहे. गेल्यावर्षी लाल मिरचीचे प्रतिकिलो 180 रुपयांपर्यंत गेलेले दर यंदा 50 ते 70 रुपयांच्या दरम्यान असल्याने मसालेदार आणि चटपटीत खाणा-यांना दिलासा मिळणार आहे.
जळगाव जिल्ह्यात स्थानिक पातळी आणि औरंगाबाद, मलकापूर, नंदुरबार, दोंडाईचा, शेलवड अशा विविध भागातून मिरची येत असते. गेल्यावर्षी सर्वच ठिकाणी उत्पादन घटल्यामुळे चपाटा, रसगुल्ला व अन्य नवीन प्रजातीच्या मिरचीचे भाव 100 ते 180 रुपये किलोवर गेले होते. यंदा मात्र भाव आवाक्यात असल्याने साठवणूक करणे सर्वसामान्यांनाही परवडणार आहे.
मिरचीच्या 150 जाती - लाल मिरचीच्या सुमारे 150 पेक्षा अधिक जाती आहेत. यापैकी बॅडगी, तेजा, 334, सी-5, सनम, फाफडा, चपाटा, दीपिका, बर्ड साय, गावरान, शिमला या जातींना अधिक पसंती दिली जाते.
भारत जगातील मोठा उत्पादक - आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मिरचीला चांगली मागणी असते. भावही चांगला मिळत असल्याने भारत जगातील मोठा मिरची उत्पादक व निर्यातदार मानला जातो. आपल्याकडून पाकिस्तान, बांगलादेश, नेपाळ, श्रीलंका, मालदीव, सिंगापूर आदी देशांमध्ये येथून माल निर्यात होतो.
नंदुरबारचे उत्पादन नावालाच - महाराष्ट्रात मिरचीचे उत्पादन मोजक्या प्रमाणात आहे. नंदुरबार भागात मिरची वाळविताना मोठमोठे ढिगा-यांचे दृश्य पाहून येथे सर्वाधिक उत्पादन होत असल्याचा समज अनेकांचा होतो. दक्षिणेकडील गुंटूर येथे दर दिवसाला 40 ते 50 किलोचे एक ते सव्वालाख पोते दररोज बाजारपेठेत दाखल होतात. तेथील दोन-तीन दिवसांमध्ये दाखल होणारी मिरची नंदुरबार परिसरातील वर्षभराचे उत्पादन आहे.
नंदुरबारला जळगावपेक्षा कमी भाव - नंदुरबार येथे मध्य प्रदेशातून मालाची मोठ्या प्रमाणात आवक झाली असून, मार्चपर्यंत ती सुरूच राहील. त्यामुळे ओल्या लाल मिरचीचे भाव 1200 ते 1700 रुपये क्विंटल तर लाल कोरड्या मिरचीचे भाव तीन हजार 500 ते सहा हजारच्या दरम्यान आहेत. गेल्या वर्षी हेच भाव अनुक्रमे 4500 व सहा हजार ते 12 हजार होते. जळगावच्या बाजारपेठेत क्विंटलचे दर पाच हजार ते आठ हजारादरम्यान तर किरकोळ विक्रीचे दर 50 ते 70 रुपये किलो आहेत.
सुकवण्याने वजनात पाचपट घट - देशात विविध प्रकारच्या मिरचीच्या जाती असून त्यांची वैशिष्ट्यही वेगवेगळी आहेत. मात्र, कुठल्याही प्रजातीची एक किलो हिरवी मिरची सुकवून लाल केल्यास त्यातून 200 ते 250 गॅम मिरची मिळते. सुकल्यावर मात्र तिखटपणा किंवा रंगाच्या बाबतीत प्रत्येक जातीचे वैशिष्ट्य कायम राहते.
एका मिरचीत होते सहा वेळा भाजी - सर्वात तिखट मिरची म्हणून ‘बर्ड साय’ परिचित आहे. या मिरचीचे उत्पादन आसाममध्ये होते. एक अख्खी मिरची भाजीत टाकल्यावर भाजी झाली की तिला काढून ठेवले आणि तशाच पद्धतीने अजून चार-पाच वेळा तिचा वापर होऊ शकतो. पाहण्यासाठी हातात धरली तरी दोन दिवस हात आग करतो, त्यामुळे हिचा दर्जा लक्षात येतो. - अशोक जाखेड, मिरची व्यापारी