आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उमेदवार अनामत रकमेच्या धनादेशांचे वितरण सुरू

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- महापालिकेची निवडणूक होऊन दोन महिने उलटले तरी अनामत रक्कम अदा केली नसल्याचे ‘दिव्य मराठी’ने उघडकीस आणल्यानंतर पालिका प्रशासनाने तातडीने प्रक्रिया पूर्ण करत बुधवारपासून रक्कम वितरित करण्यास सुरुवात केली आहे. मागणीनुसार 326 उमेदवारांचे 11 लाख रुपयांचे धनादेश तयार करण्यात आले आहेत.

महापालिका निवडणुकीत 406 उमेदवारांनी भाग्य अजमावले होते. यापैकी 207 जणांचे डिपॉझीट जप्त झाले होते. त्यामुळे अपेक्षित मतदान मिळालेल्या 199 जणांनी तसेच माघार घेतलेल्या 205 जणांची अनामत रक्कम पालिका प्रशासनाकडे जमा होती. मागणी करूनही प्रशासनाकडून कोणतीही दखल घेतली जात नसल्याने अनेकांनी अर्ज करून मागणी सुरू केली होती. याबाबत ‘दिव्य मराठी’ने 3 नोव्हेंबरच्या अंकात वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर पालिका प्रशासनाने तातडीने हालचाली करत दिवाळीच्या सुटीत प्रक्रिया पूर्ण केली आहे. सुटीनंतर पहिल्याच दिवशी बुधवारी सकाळी मागणीनुसार अनामत रकमेचे धनादेश वितरित करण्यास सुरुवात झाली आहे.

326 धनादेश तयार

निवडणुकीनंतर अनामत रक्कम मिळावी म्हणून कार्यालय अधीक्षकांकडे अर्ज आले होते. त्यानुसार 326 जणांच्या मागणीचे बिले तयार करून ते अकाउंट विभागाकडे पाठवण्यात आली होती. मिळालेल्या माहितीनुसार 326 जणांचे 5 हजार व 2500 रुपयांप्रमाणे सुमारे 11 लाख रुपयांचे धनादेश अकाउंट विभागाने तयार करून ठेवले आहेत. पुराव्यानिशी येणार्‍यांना धनादेश वितरित केले जात आहेत.


महापौरांना रक्कम अदा

पालिकेच्या महापौर राखी सोनवणे व उपमहापौर सुनील महाजन यांच्यासह नगरसेवकांना अकाउंट विभागाकडून अनामतचे धनादेश पाठवण्यात आले आहेत. पहिल्या दिवशी 36 जणांना 1 लाख 20 हजार रुपये वितरित करण्यात आले. गुरुवारपासून यासाठी गर्दी होण्याची शक्यता आहे. उमेदवारांचे धनादेश वटवण्यासाठी बॅँकेत खाते आवश्यक असून तीन महिन्यात धनादेश वटवणे गरजेचे असल्याची माहिती लिपिक मनोज शर्मा यांनी दिली.