आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्षेत्रीय बैठक घ्यायला नगरसेवकांची टाळाटाळ

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धुळे - महापालिकेची निवडणूक होऊन दोन वर्षे झाली. या कालावधीत नगरसेवकांनी चार क्षेत्रीय बैठका घेणे नियमाप्रमाणे अावश्यक होते; परंतु एकाही नगरसेवकाने या बैठका घेतल्या नाहीत. त्यामुळे नगरसेवकांना अपात्र ठरवण्याचा अधिकार आयुक्तांना असून, या विषयी त्यांनी निर्णय घ्यावा, या मागणीसाठी आमदार अनिल गोटेंतर्फे तेजस गोटे यांनी महापालिकेचे उपायुक्त डॉ. प्रदीप पठारे यांना निवेदन दिले.
महापालिका अधिनियम १९४९च्या कलम २९ मध्ये नगरसेवकांना क्षेत्रीय बैठका घेणे बंधनकारक आहे. क्षेत्रीय बैठक घेताना क्षेत्रसभेचा कार्याध्यक्ष हा क्षेत्रसभेची बैठक बोलावेल. त्यानंतर क्षेत्र सभेचा सचिव कार्याध्यक्ष निश्चित करेल, त्याप्रमाणे दिनांक, वेळ ठिकाण निश्चित करून सभेची नोटीस काढेल, असे नियमात नमूद आहे. त्यानुसार क्षेत्रसभेच्या दोन बैठकांमध्ये सहा महिन्यांचा कालावधी असावा. शासनाच्या नियमाचे पालन केल्यास महापालिका अधिनियम १९४९ २९ (२) मध्ये नगरसेवकाला अपात्र ठरवण्याची तरतूद आहे. त्यात कार्याध्यक्ष पोटकलम (१) मध्ये तरतूद केल्याप्रमाणे एकंदर दोन वर्षाच्या कालावधीत, क्षेत्रसभेच्या सलग चार बैठका बोलावण्यात नगरसेवकाने कसूर केली असेल तर राज्य शासन, राजपत्रातील आदेशाद्वारे आयुक्तांनी दिलेल्या निर्देशावरून पालिका सदस्य असण्यापासून अपात्र ठरतील. महापालिकेची निवडणूक होऊन दोन वर्षांचा कालावधी पूर्ण झाला आहे. निवडून आलेल्या नगरसेवकांना क्षेत्रीय सभा घेणे बंधनकारक असताना एकाही विद्यमान नगरसेवकाने एकही क्षेत्रसभा घेतलेली नाही. हा प्रकार माहिती अधिकारात उघड झाला आहे. आयुक्तांनी नगरसेवकाना अपात्र ठरवावे या विषयी ३१ डिसेंबरपूर्वी निर्णय घ्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

भोगवट्या नंतर मुद्दा
आमदार अनिल गोटे यांनी यापूर्वी आयुक्त डॉ. भोसले यांना दिलेल्या पत्रात ज्या नगरसेवकांनी भोगवटा प्रमाणपत्र घेतले नाही, त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई करण्याची मागणी केली होती. त्यानंतर या विषयावर महासभा घेण्यात आली होती. आता पुन्हा क्षेत्रीय सभा घेतल्याने नगरसेवकांना अपात्र ठरवावे, अशी मागणी आमदार गोटे यांनी केल्याने नगरसेवकांवर अपात्रतेची टांगती तलवार आहे.
बातम्या आणखी आहेत...