आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजळगाव - वाघूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावल्याने पाणीसाठय़ात चांगलीच वाढ होतेय. धरण 100 टक्के भरण्यापासून केवळ अडीच मीटर लांब असून, सततच्या वाढीमुळे आता जळगावकरांना एक दिवसाआड पाणीपुरवठा करणे शक्य आहे. नव्या महापौरांनी आणि पदाधिकार्यांनी तशी घोषणा करून जळगावकरांना आनंदाची बातमी देण्याची अपेक्षा आहे.
जळगाव शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी सर्वात महत्त्वाचा स्रोत असलेल्या वाघूर धरणाने यंदा पाणीसाठय़ाचा उच्चांक गाठला आहे. यापूर्वी सर्वाधिक 43 टक्के पाणीसाठय़ाची नोंद होती; परंतु वाघूर व कांग नदीला परतीच्या पावसामुळे आलेल्या पुराने धरणाच्या साठय़ात सातत्याने वाढ होते आहे. गेल्या दोन-तीन दिवसांतील मुसळधार पावसाने धरणात सुमारे 68.71 टक्के पाणीसाठा झाला आहे. धरणाची क्षमता 234.100 मीटर असून, गुरुवारी रात्री 8 वाजेपर्यंत 231.650 मीटर एवढा पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे धरण 100 टक्के भरण्यासाठी केवळ 2.450 मीटर शिल्लक असून, महिनाअखेरपर्यंत पावसाने हजेरी लावल्यास त्यात वाढ होऊ शकते. सध्या धरणात 247.511 दलघमी साठा आहे.
साठा सत्तरी ओलांडण्याच्या तयारीत
सध्या वाघूर धरणातील पाणीसाठा सत्तरी ओलांडण्याच्या तयारीत आहे. वाघूर व कांग नदीतून पाण्याचा ओघ सुरूच असल्याने धरणाच्या साठय़ात वाढ होताना दिसत आहे. पहिल्यांदाच एवढय़ा मोठय़ा प्रमाणात धरण भरले असून, त्याचा फायदा जळगावकरांना होऊ शकतो. त्यामुळे शहराचे दोन टप्प्यात विभाजन करून महापालिका शहरवासीयांना एक दिवसाआड पाणीपुरवठा करू शकेल अशी परिस्थिती आहे.
अजेंड्यातील मुद्यांवर भर
पालिकेच्या निवडणुकीत सर्वच राजकीय पक्षांनी शहराला दररोज पाणीपुरवठा करण्याचे वचन जाहीरनाम्याच्या माध्यमातून दिले होते. त्यामुळे सर्वच पक्षांसाठी पाणीपुरवठय़ाचा मुद्दा महत्त्वाचा आहे. रोज 24 तास पाणी देण्याची घोषणा करणार्यांनी किमान पूर्वीप्रमाणे एक दिवसाआड तरी पाणीपुरवठा सुरू करावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येते आहे.
* धरणातील पाणीसाठय़ात चांगली वाढ झाली आहे. त्यामुळे आगामी काळात पाणीटंचाईची शक्यता नाही.उपलब्ध पाणी पुढची काही वर्षे जळगावकरांची तहान भागवायला पुरेसे आहे. शहराला सध्या 60 एमएलडी पाणी लागते. आधी ते 89 एमएलडी इतके लागत होते. नितीन बरडे, सभापती, पाणीपुरवठा विभाग
सध्या दोन दिवसाआड होतोय पाणीपुरवठा
उन्हाळ्यात शहर भीषण पाणीटंचाईच्या उंबरठय़ावर असताना धरणातील मृत साठा उचलण्यासाठी डाऊन स्कीम राबवण्यात आली होती; परंतु जून महिन्याच्या सुरुवातीलाच पावसाने हजेरी लावल्यामुळे मृत साठय़ापेक्षा जास्त साठा निर्माण झाल्याने या स्कीमची गरज भासली नाही. त्यामुळे प्रशासनाने तीन दिवसांऐवजी दोन दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचे नियोजन केले. त्यासाठी शहराचे तीन टप्पे करण्यात आले होते. त्यानुसार आजही पाणीपुरवठा सुरू आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.