Home | Maharashtra | North Maharashtra | Jalgaon | Rehabilitate former minister Eknath Khadse, BJPs Jalgaon district resolution

माजी मंत्री एकनाथ खडसेंचे पुनर्वसन करा, भाजपच्या जळगाव जिल्हा बैठकीत ठराव

प्रतिनिधी | Update - Aug 27, 2017, 04:43 AM IST

जळगावला भाजपचा बालेकिल्ला बनवण्यात माेठे याेगदान असलेले माजी मंत्री एकनाथ खडसे गेल्या दीड वर्षापासून सत्तेबाहेर अाहेत.

  • Rehabilitate former minister Eknath Khadse, BJPs Jalgaon district resolution
    जळगाव - जळगावला भाजपचा बालेकिल्ला बनवण्यात माेठे याेगदान असलेले माजी मंत्री एकनाथ खडसे गेल्या दीड वर्षापासून सत्तेबाहेर अाहेत. अाराेप असलेल्या इतर मंत्र्यांच्या तुलनेत मुख्यमंत्र्यांनी खडसेंना वेगळा न्याय लावला अाहे. एकही अाराेप सिद्ध हाेऊ न शकल्याने पक्षाने अाता खडसेंचे राजकीय पुनर्वसन करावे, असा ठराव भाजपच्या जिल्हा व महानगरच्या संयुक्त बैठकीमध्ये करण्यात अाला. प्रमुख कार्यकर्त्यांचे शिष्टमंडळ केंद्रातील नेत्याची भेट घेणार असून प्रसंगी मुंबईत अाझाद मैदानावर अांदाेलन करण्याची तयारी कार्यकर्त्यांनी बैठकीत बाेलून दाखवली.

    शहरातील बालाणी रिसाॅर्टमध्ये शनिवारी पक्षाची बैठक अायाेजित करण्यात अाली हाेती. पक्षबांधणी, स्वर्णिम भारत अभियान, अागामी निवडणुकीच्या तयारीच्या अनुषंगाने अायाेजित बैठकीत एकनाथ खडसे यांचे समर्थक अाक्रमक हाेते. सत्तेत उद्याेगमंत्री सुभाष देसाई, प्रकाश मेहता यांच्यावर अाराेप हाेत असले तरी त्यांना खडसेंप्रमाणे पद साेडण्याची गरज पडली नाही. नेत्यांनी त्यांच्यासाठी वेगळा अाणि खडसेंसाठी वेगळा न्याय लावला. पक्षाची उत्तर महाराष्ट्रात बांधणी करणारा प्रमुख नेता अाज प्रसववेदना साेसत अाहे. जिल्ह्यात ज्यांच्यामुळे पक्ष उभा राहिला, अनेक नेते, कार्यकर्ते घडले त्यांच्यावर अशी वेळ अाल्यामुळे अाता सहन करणार नसल्याचा इशारा कार्यकर्त्यांनी दिला.
    सभागृहात कार्यकर्त्यांचा अाक्रमकपणा पाहून माजी अामदार डाॅ.बी. एस. पाटील यांनी खडसेंच्या राजकीय पुनर्वसनाचा ठराव मांडला. सर्वांनी हात उंच करून त्याला प्रतिसाद दिला. खडसेंच्या पुनर्वसनासाठी केंद्रात जाऊन नेत्यांना भेटण्यासाठी शिष्टमंडळ तयार केले जाईल. सरकारपर्यंत अापल्या भावना पाेहोचवण्यासाठी मुंबईत अाझाद मैदानावर लाखाेंच्या संख्येने जाऊन अांदाेलन करण्याचे अावाहन डाॅ.बी. एस. पाटील यांनी केले. त्याला कार्यकर्त्यांनी प्रतिसाद दिला.

Trending