आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमळनेर पालिकेत नगरसेविकांच्या पतींचा सर्रास वावर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमळनेर - अमळनेर नगरपालिकेतील महिला नगरसेवकांच्या पती राजांचीच कामगिरी पाहता कर्मचाऱ्यांसह इतर नगरसेवकही या पतीदेवांच्या वाढत्या हस्तक्षेपाने कमालीचे बेजार झाले आहेत. त्यामुळे येथील महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे प्रतिनिधी रामभाऊ संदानशिव यांनी कारवाईचे पत्रक काढून खळबळ माजवून दिली.

राज्यातील नगरपरिषदांमध्ये महिलांना ५० टक्के आरक्षण आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेत महिला पुरुषांच्या सोबत बहुसंख्येने निवडून येतात. मात्र, त्या निवडून आल्या असल्या तरी कारभार मात्र त्यांचे पतीदेवच पाहत असल्याचे दिसून येते. असाच काहीसा प्रकार अमळनेर नगरपरिषदेत सुरू आहे.
अमळनेर नगरपरिषदेत ३३ पैकी १७ महिला नगरसेवक निवडून आल्या आहेत. या निवडून आलेल्या नगरसेवक महिलांचे पतीदेवच कारभाराचा गाडा हाकताना दिसून येतात. प्रसंगी नगरपरिषदेतील कर्मचाऱ्यांशी वाद घालतात. त्यामुळे या नगरसेवक महिलांच्या पतींवर महाराष्ट्र शासनाने काढलेल्या परिपत्रकान्वये कारवाई करण्याची मागणी कॉंग्रेस पक्षाच्या वतीने रामभाऊ संदानशिव आणि मनोज पाटील यांनी केली आहे.

नगरपरिषदेतील मुख्याधिकारी आणि कर्मचाऱ्यांना महिला नगरसेवकांचे पती यांचाच त्रास असून दिवसभर ते नगरपरिषदेच्या आवारात ठाण मांडून असतात. नगरपरिषदेच्या बैठकींना हे पतीच उपस्थित असतात. तर पती हे बैठकींना उपस्थित राहून प्रशासकीय कामात अडथळा आणतात. त्यामुळे या पतींवर महाराष्ट्र शासनाने २० जुलै १९९३ रोजी काढलेल्या परिपत्रकान्वये कारवाई करण्याची मागणी करण्यात अाली आहे. वास्तविकता नगरपरिषदेच्या इमारतीत सीसीटीव्ही कॅमेरे बसवले असून ते केवळ शोपिस ठरत आहेत. हे सीसीटीव्ही कॅमेरे तपासले असता या पती महाशयांचे प्रताप उघड झाल्याशिवाय राहणार नाहीत.

असा आहे नियम
महिला सदस्यांचे पती अथवा नातेवाईक नगरपालिकेच्या कामात ढवळाढवळ, हस्तक्षेप करत असल्यास किंवा कर्मचारी अथवा अधिकाऱ्यांशी वाद घालणे अादींसारखी गैरवर्तणूक करीत असल्यास अध्यक्ष किंवा मुख्याधिकाऱ्यांना याची दखल घेऊन या महिला सदस्यांच्या पतीदेव अथवा नातेवाइकांवर तत्काळ कारवाई करता येते.

कोण करेल कारवाई?
अमळनेर नगरपालिकेतील एकूण ३३ पैकी १७ महिला नगरसेविका आहेत. त्यामुळे महिलांचे अधिक वर्चस्व आहे. यातील बहुतांश महिला या सभा, बैठाका यासाठीच हजर राहतात. बाकी त्यांचे पतीच काम पाहतात. त्यामुळे कर्मचारी वर्ग मोठ्या प्रमाणात वैतागला आहे. यावर कोण कारवाई करणार, हा प्रश्न चिन्हच आहे.