आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अक्कलपाड्यातून पाणी सोडा : मुख्यमंत्री

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धुळे - अक्कलपाडा धरणातील मृत जलसाठा पांझरा नदीत सोडावा, अशी मागणी आमदार प्रा. शरद पाटील यांनी केली होती. पाणी सोडण्याच्या प्रश्नावर राजकारण होत असल्याने आमदार प्रा. शरद पाटील यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची भेट घेतली. मुख्यमंत्र्यांनी विभागीय आयुक्तांना चोवीस तासांत पाणी सोडण्याचे आदेश दिल्याची माहिती आमदार प्रा. शरद पाटील यांनी दिली.

अक्कलपाडा प्रकल्पातील पाणी पांझरेत सोडावे, या मागणीसाठी आमदार प्रा. शरद पाटील यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी प्रकाश महाजन यांना घेराव घालण्यात आला होता. त्या वेळी पाणी सोडण्याचे लेखी आदेश जिल्हाधिकारी प्रकाश महाजन यांनी दिले होते. त्यानंतरही धरणातून पाणी सोडण्यात आले नाही. या पार्श्वभूमीवर आमदार प्रा. शरद पाटील, आमदार साहेबराव पाटील (अमळनेर) यांनी काल सोमवारी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, पालकमंत्री सुरेश शेट्टी यांची भेट घेतली. त्यानंतर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी विभागीय आयुक्तांना या धरणातून 24 तासांच्या आत पाणी सोडण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे येत्या 24 तासांत या धरणातून पाणी सोडले जाईल. धरणातून पाणी सोडले जाणार असल्याने शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांनी सुरू केलेले आंदोलन मागे घ्यावे, असे आवाहन आमदार प्रा. पाटील यांनी केले आहे.

या गावांना होणार पाण्याचा लाभ

पांझरेच्या पात्रातून सोडण्यात येणार्‍या पाण्याचा लाभ साक्री तालुक्यातील अक्कलपाडा, चिंचखेडा. धुळे तालुक्यातील भदाणे, नवे भदाणे, देऊर खु., देऊर बु., नेर, नूरनगर, अकलाड, मोराणे, कुसुंबा, कावठी, मेहेरगाव, खेडे, सुट्रेपाडा, वार, कुंडाणे, नकाणे, महिंदळे, वलवाडी, भोकर, वरखेडे, कुंडाणे, निमखेडी, जापी, शिरढाणे, सातरणे, डांगरी, कौठळ, न्याहळोद, बिलाडी, तामसवाडी, हेंकळवाडी, मोहाडी प्र. डां., विश्वनाथ, सुकवड. अमळनेर तालुक्यातील 15 गावांची स्थानिक पाणीपुरवठा योजना आणि शिंदखेडा तालुक्यातील 28 गावांच्या पाणीपुरवठा योजनांना होणार आहे.
जिल्हाधिकार्‍यांनी केली पाहणी
मुख्यमंत्री व विभागीय आयुक्तांनी पाणी सोडण्याचे आदेश दिल्यानंतर जिल्हाधिकारी प्रकाश महाजन यांनी मंगळवारी अक्कलपाडा धरणाची पाहणी केली. या वेळी त्यांनी सार्वजनिक पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता प्र. न. ठाकरे यांच्याकडून पाणी सोडण्याची माहिती घेतली. तसेच पाणी सोडण्याचे नियोजन करण्याची सूचना केली. त्यानुसार मंगळवारी रात्री किंवा उद्या बुधवारी सकाळी पाणी सोडले जाण्याची शक्यता असल्याची माहिती पाटबंधारे विभागाकडून देण्यात आली.