आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Repairing In Nashirabad, Suffer Bhusawal Residents

दुरुस्ती नशिराबादला, त्रास भुसावळ शहरवासीयांना!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भुसावळ - महावितरण कंपनीच्या नशिराबाद येथील १३२ केव्ही उपकेंद्रात शनिवारी मेंटनन्सचे काम करण्यात आले. त्यामुळे भुसावळ शहरातील अर्ध्या भागाचा वीजपुरवठा शनिवारी सकाळी तब्बल साडेपाच तास खंडित होता. सकाळी १० वाजता खंडित झालेला वीजपुरवठा दुपारी ३.३० वाजता सुरळीत झाला. दुरुस्तीचे काम नशिराबादला होत असताना भुसावळकरांना मात्र त्रास सहन करावा लागला.

वीज वितरण कंपनीकडून दर शनिवारी तांत्रिक कारणांमुळे अघोषित भारनियमन केले जाते. यामुळे शहरवासी आता वैतागले आहेत. शहरातील उत्तर भागाला साकेगाव येथील ३३ बाय ११ केव्ही उपकेंद्रातून वीजपुरवठा केला जातो. तर साकेगाव केंद्राला नशिराबाद येथील १३२ केव्ही उपकेंद्रातून जोडणी देण्यात आली आहे. शहरातील उत्तर भागातील शांतीनाथनगर आणि भुसावळ सिटी या दोन फीडरला साकेगाव उपकेंद्रातून जोडणी देण्यात आली आहे. दर शनिवारी शहर, साकेगाव केंद्र किंवा नशिराबाद १३२ केव्ही उपकेंद्रात मेंटनन्स केले जाते. यामुळे शहरातील अर्ध्या भागाचा वीजपुरवठा खंडित केला जातो. साकेगाव किंवा नशिराबाद येथेही दुरुस्तीचे काम पूर्ण करत असताना शहरातील नागरिकांना झळ सहन करावी लागते. शहरातील उत्तर भागात अर्थात शांतीनगर आणि भुसावळ सिटी फीडरच्या अंतर्गत तब्बल २० हजार वीजग्राहक आहेत. या ग्राहकांना विनाकारण खंडित वीजपुरवठ्याचा त्रास सहन करावा लागतो. शहरातील उत्तर भागातील दोन्ही फीडरमध्ये वीजबिल थकबाकीचे प्रमाण अत्यल्प आहे, यासह वीजगळती आणि चोरीचेही प्रमाण अत्यल्प आहे. असे असतानाही या भागातील नागरिकांना शनिवारी विनाकारण खंडित वीजपुरवठ्याचा त्रास सहन करावा लागतो. तिन्ही उपकेंद्रातून वीजपुरवठा सुरळीत असतो तेव्हाच खडका येथील २२० केव्ही केंद्रात तांत्रिक दोष निर्माण होतात. यामुळेही वीजपुरवठा वारंवार खंडित होण्याचे प्रमाण वाढते.

या भागांचा वीजपुरवठा खंडित : कोणत्याही उपकेंद्रात बिघाड झाला तर शांतीनगर, तापीनगर, हिंदू हाऊसिंग सोसायटी, सहकारनगर, प्रभात कॉलनी, गजानन महाराजनगर, गणेश कॉलनी, भिरुड कॉलनी, मोहितनगर, आराधना कॉलनी, वेडीमाता मंदिर परिसर यासह दोन्ही बाजूंच्या विस्तारित वसाहती, जुना सतारे या भागांतील वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रमाण वाढले आहे.

लवकरच तोडगा काढू
शांतीनाथनगर आणि सिटी या दोन्ही फीडरवर वीज खंडित होण्याचे प्रकार वाढतात. लवकरच यावर उपाय शोधू. पूर्वी वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रमाण अधिक होते. सध्या यावर नियंत्रण आहे. शनिवारी मेंटनन्समुळे वीज खंडित होते, यावर तोडगा निघेल. ए. आर. आलेगावकर, अतिरिक्त कार्यकारी वीज अभियंता, भुसावळ

सुटीवर पडते विरजण
शासकीय कर्मचाऱ्यांना शनिवारी सुटी जाहीर झाली आहे. मात्र, शनिवारी वीजपुरवठा खंडित होणार असल्याने चाकरमान्यांच्या सुटीवर विरजण पडत आहे. यामुळे शहराच्या उत्तर भागातील नागरिकांच्या संतापाचा पारा वाढतो.