आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सलोखा निर्माण होणे आवश्यक, आदिवासी राज्यमंत्री राजेंद्र गावित यांचे प्रतिपादन

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धुळे - दंगलीसारख्या घटनांमुळे जिल्ह्याची प्रगती खुंटते, अनेकांचा रोजगार बुडतो. त्यामुळे शहरात दंगलीसारख्या घटना पुन्हा पुन्हा घडू नये, यासाठी समाजात एकोपा व सलोखा निर्माण करण्याची गरज असल्याचे मत आदिवासी राज्यमंत्री राजेंद्र गावित यांनी व्यक्त केले.

प्रजासत्ताकदिनानिमित्त येथील पोलिस कवायत मैदानावर ध्वजवंदनाचा मुख्य कार्यक्रम झाला. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा कलाबाई ठाकरे, महापौर मंजुळा गावित, जिल्हाधिकारी प्रकाश महाजन, जिल्हा पोलिस अधीक्षक प्रदीप देशपांडे, जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी अनिल लांडगे, निवासी उपजिल्हाधिकारी विवेक गायकवाड, भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. एस. एस. गुप्ता, अतिरिक्त पोलिस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह, माजी मंत्री डॉ. शालिनी बोरसे, कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्यामकांत सनेर, शहराध्यक्ष युवराज करनकाळ यांच्यासह स्वातंत्र्यसैनिक, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी, विद्यार्थिनी आदी उपस्थित होते. राज्यमंत्री राजेंद्र गावित म्हणाले की, सामाजिक सलोखा निर्माण करण्यासाठी समाजातील प्रत्येक घटकाने पुढाकार घेण्याची गरज आहे. जिल्ह्यात सामाजिक सलोखा निर्माण झाला तर जिल्ह्याच्या प्रगतीस कुणीही आडकाठी आणू शकणार नाही. जिल्ह्यात यंदा पाऊस कमी झाल्याने टंचाई निर्माण झाली आहे. टंचाईला तोंड देण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. समाजात मुलींची संख्या झपाट्याने कमी होत आहे. हे समाजाला परवडणारे नाही. समाजात महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहे. त्यामुळे मुलगा, मुलगी हा भेद करणे चुकीचे आहे. शिक्षण हक्क कायद्यामुळे सर्वांना मोफत, सक्तीचे शिक्षण घेण्याचा अधिकार प्राप्त झाला आहे. गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याची जबाबदारी शिक्षक, शाळा व्यवस्थापन समितीची आहे. समाजातील तळगाळातील नागरिकांच्या उन्नतीसाठी सामाजिक न्यायाचे धोरण प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. त्यासाठी सामाजिक न्याय विभागातर्फे विविध योजना राबविल्या जात आहेत. अपंग व वृद्धांचे प्रश्न सोडविण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कार्यक्रमात विविध शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थी-विद्यार्थिनींनी सांस्कृतिक कार्यक्रमांसह देशभक्तीपर गीत, ज्यूदो, कराटेचे प्रात्यक्षिक सादर केले. राज्यमंत्री राजेंद्र गावित यांनी पोलिस संचलनाची पाहणी करून मानवंदना स्वीकारली. दरम्यान, शहरातील शाळा, महाविद्यालयांत विविध प्रकारचे कार्यक्रम झाले. त्यात ध्वजवंदनासह इतर कार्यक्रमांचा समावेश होता.

या पुरस्कारांचे झाले वितरण
कार्यक्रमात राज्यमंत्री गावित यांच्या हस्ते विविध पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. पुरस्कारार्थी असे : गृहरक्षक दलाचे योगेंद्र रामदास देसले, भिका विठ्ठल सोनवणे, भटू पुंडलिक शेलार (राष्ट्रपती पदक), पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर पुरस्कार- नीलिमा सीताराम थोरात (शिरपूर), भाग्यर्शी अभय कुलकर्णी (धुळे), रत्नमाला ज्ञानेश्वर पाटील (फागणे), तारका सुभाषचंद्र विवरेकर (साक्री). गुणवंत खेळाडू- पंकज मनोहर बारी, प्रियंका दीपक पाटील, गुणवंत क्रीडा संघटक- कैलास भिका कंखरे, आनंद पवार. सामाजिक वनीकरण विभागातर्फे राष्ट्रीय हरितसेना बी संकलन मोहिमेंतर्गत उत्कृष्ट कार्य करणार्‍या महाराणा प्रताप हायस्कूल (धुळे), इंदिरा गांधी हायस्कूल (धुळे), परमपूज्य पांडुरंगशास्त्री विद्यालय (नंदाणे, ता. धुळे) यांना सन्मानित करण्यात आले.