आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Research News In Marathi, Car Model, Fuel, Engineering Student, Jalgaon

संशोधन: 14 हजारांत तयार केले हवेवर चालणार्‍या कारचे मॉडेल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - इंधनाचा वाढता वापर, टंचाई आणि महागाईवर मात करण्यासाठी गोदावरी अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी चक्क पेट्रोल, डिझेल, सौरऊर्जा, बॅटरी यांच्या शिवाय हवेच्या दाबावर चालणारे कार मॉडेल (सांगाडा) तयार केले आहे. 14 हजार रुपये खर्च आलेल्या या मॉडेलमध्ये आणखी संशोधन झाल्यास भविष्यात महागड्या इंधनाला पर्याय ठरू शकतो.


गोदावरी अभियांत्रिकीतील मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे शिक्षक मिलिंद धनके यांच्या मार्गदर्शनात त्रिरत्न तायडे, प्रमोद कोळी, विनय सोनवणे या विद्यार्थ्यांनी हा अफलातून प्रयोग साकारला आहे. विशेष म्हणजे यासाठी टाकाऊ वस्तुंचा वापर केला आहे. सध्या प्रायोगिक पातळीवर तयार झालेले मॉडेल रस्त्यावर धावू शकते. मात्र, अद्याप मॉडेलवर आणखी संशोधन करून त्याची शक्ती वाढवण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यानंतर त्याला आकर्षक कारची बॉडी बसवून पूर्णत्वास आणण्याचा संशोधकांचा प्रयत्न आहे.


अशी आहे कार
सध्या स्थितीत तयार असलेले मॉडेलचे वजन 82 किलोग्रॅम आहे. त्यावर दोन प्रवासी बसण्याची व्यवस्था केली आहे. हवा साठवण्यासाठी 20 बारची (किलोग्रम पर सेंटीमीटर स्क्वेअर) टाकी आहे. या टाकीत कॉम्प्रेसरने हवा भरली जाते. कॉकच्या माध्यमातून हवा इंजीनपर्यंत सोडता येते. पायात दुचाकीप्रमाणे चार गियर आहेत. 7 बार हवेत मॉडेल 500 मीटरपर्यंत धावते.


दुचाकीच्या इंजीनचा वापर
या प्रयोगासाठी विद्यार्थ्यांनी दुचाकीचे 100 सीसीचे नादुरुस्त इंजीन खरेदी करून त्याला दुरुस्त केले. त्यानंतर इंजीनच्या कॅम शॉफ्टमधील व्हॉल्व्ह बंद, उघडण्याच्या टायमिंगचा अभ्यास करून त्या इंजीनमध्ये हवेचा दाब सोडून ते कार्यान्वित केले. फोर स्ट्रोक पेट्रोल इंजीनचे रुपांतर टू स्ट्रोक एअर मोटारमध्ये केले आहे. इंजीनच्या सायलेन्सरच्या बाजूने दाब आत सोडला जातो.


हे आहेत संशोधन करणारे विद्यार्थी
* विनय सोनवणे
* प्रमोद कोळी
* त्रिरत्न तायडे
अत्यंत कमी खर्चात टाकाऊ वस्तूंचा वापर करून हे मॉडेल तयार केले आहे. पुढीत वर्षी आणखी जास्त संशोधन करून मॉडेलचे पेटंट घेण्यासाठी महाविद्यालय प्रयत्न करणार आहे. मिलिंद धनके, प्रोजेक्ट गाइड