आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वेगवेगळ्या बँकांसाठी एकाच एटीएमद्वारे व्यवहार शक्य

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- प्रत्येक बँकेत व्यवहार करण्यासाठी स्वतंत्र एटीएम कार्ड वापरता एकाच कार्डाच्या आधारे विविध बँकेतून व्यवहार करणे शक्य होणार आहे. जळगावातील शास्त्रीनगरात राहणाऱ्या सध्या पुण्यातील अभियांत्रिकी महाविद्यालयात कार्यरत असलेल्या प्रा.उज्ज्वल शिरोडे यांनी बहुपर्यायी एटीएम कार्डचा शोध लावला आहे. या नवीन तंत्रज्ञानामुळे एटीएम मशीनचा आकार कमी होण्यासह सुरक्षित व्यवहार करणेही शक्य होणार आहे.
एखाद्या व्यक्तीचे विविध बँकेत खाते असल्यास प्रत्येक व्यवहारासाठी वेगवेगळ्या बँकांचे एटीएम कार्ड जवळ बाळगावे लागतात. मात्र, प्रा.उज्ज्वल शिरोडे यांनी कुठल्याही बँकेतील व्यवहारासाठी ‘ऑल इन वन’ एटीएम कार्डचा शाेध लावला आहे. त्यामुळे एकापेक्षा अधिक कार्ड बाळगणे आणि त्यांचे वेगवेगळे पीन नंबर लक्षात ठेवण्याची कटकट यामुळे संपणार आहे. या कार्डचा उपयोग नोकरदारांचे वेतन, शिष्यवृत्ती, प्राप्तीकर भरणे यासाठी होऊ शकतो. तसेच बँकांचे व्यवहारदेखील या कार्डमुळे सुलभ होणार आहेत. ग्राहकांचीही ठराविक एटीएममधून पैसे काढण्यासाठी होणारी तारांबळ थांबणार आहे. दीड वर्ष चाललेल्या या संशोधनासाठी प्रा.उज्ज्वल शिरोडे यांना अजय गाढे प्रभाकर कराडे यांनी सहकार्य केले आहे.
इंजिनिअरिंगचे शिक्षण जळगावात
शास्त्रीनगरात राहणाऱ्या प्रा. उज्ज्वल शिरोडे यांनी बांभोरीच्या एसएसबीटी इंजिनिअरिंग कॉलेजमधून बीई केले होते. त्यानंतर उमवितून यूएलएसआय (चिफ मॅन्युफॅक्चरिंग) विषयातून एमटेक केले आहे. येथे शिक्षण घेतल्यावर पिंप्री चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून काम करण्यासह त्यांनी संशाेधन सुरू ठेवले आहे.
यापूर्वीच्या पेटंटची कोटींत विक्री
सध्याच्या तीव्र वायरलेस फ्रिक्वेंसी पद्धतीमुळे मानवी आरोग्य तसेच प्राण्यांवर दुष्परिणाम होतात. या तंत्रज्ञानात बदल करण्यासाठी शिरोडे त्यांच्या सहकाऱ्यांनी संशोधन केले होते. ‘वायरलेस सिक्युरिटी अॅण्ड प्रोटोकॉल’विषयी केलेल्या संशोधनाला पेटंट मिळवले होते. तोशिबा कंपनीने नोव्हेंबर २०१४मध्ये हे पेटंट कोटीला विकत घेतले आहे.
असा करता येईल वापर
व्ही.एच.पी.एल. प्रोग्रॅमिंगच्या माध्यमातून संबंधित संशोधकांनी माहिती संकलित केली आहे. युनिव्हर्सल कार्डमुळे कुठल्याही बँकेच्या एटीएम मशीनमध्ये स्वॅप केल्यावर बँकेच्या नावाचा पर्याय दिसेल. ग्राहकाला ज्या बँक खात्यातून पैसे काढायचे असतील, त्यावर क्लिक करून पैसे काढता येतील.
मुख्यमंत्र्यांशी चर्चा
- बहुपयोगी एटीएम कार्डमुळे बँकेचे व्यवहार सोपे आणि सुरक्षित होतील. यासंदर्भात आरबीआयच्या अधिकाऱ्यांशी प्राथमिक चर्चा झाली आहे. मात्र, याची अंमलबजावणी करायची असल्यास सरकारची मान्यता आवश्यक असल्याने मुख्यमंत्र्याची भेट घेणार आहे. तसेच पेटंटसाठी अर्ज केला असून वर्षभराच्या आत याची मान्यता मिळण्याची तरतूद आहे.
प्रा. उज्ज्वल शिरोडे, संशोधक.
बातम्या आणखी आहेत...