आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजळगाव - शहरातील मालमत्तांचा आकडा वाढूनही त्याचे सर्वेक्षण होत नाही. त्यामुळे पालिकेच्या उत्पन्नावर परिणाम होत आहे. यासाठी प्रत्येक प्रभागातील मालमत्तांचे सर्वेक्षण करण्याचे आदेश महापौर किशोर पाटील यांनी दिले आहेत.
घरपट्टी वसुलीची माहिती घेण्यासाठी महापौरांनी गुरूवारी बैठक घेतली. यात शहरातील वर्षानुवर्षे रखडलेल्या कामांची माहिती घेण्यात आली. विशेष म्हणजे शहरातील रस्त्यांचे रुंदीकरण होऊनही विजेचे खांब रस्त्यातच आहेत. त्यामुळे रस्ता रुंदीकरणाचा काहीही उपयोग होत नसून अपघातांना सामोरे जावे लागते. या विषयावर चर्चा करताना महापौर पाटील यांनी गणेश कॉलनी, शिव कॉलनी, रायसोनीनगर, भोईटेनगरातील विद्युत खांब स्थलांतरित करण्यासंदर्भातील अडचणी समजून घेतल्या. तसेच वीज मंडळाशी चर्चा करून मार्ग काढण्याच्या सूचना दिल्या.
बंद बोअरवेल्स सुधारण्याच्या सूचना
महापालिकेचे कार्यालयीन कामकाज हे संगणकीकृत करणे, बंद अवस्थेत असलेल्या बोअरवेल दुरुस्त करणे, प्रॉपर्टी बखळ झाल्यानंतरही कर चालू आहे तो बंद करणे, घरपट्टीच्या डिमांड नोटमध्ये गट नंबर, प्लॉट नंबर नमूद करण्याच्या सूचना देण्यात आल्या. गेल्या 10 ते 12 वर्षांपासून शहरातील मालमत्तांचे सर्वेक्षण होऊ शकलेले नाही. त्याचा परिणाम उत्पन्नावर होऊ नये अशा सक्त सूचना देण्यात आल्या. या वेळी प्रभाग समिती सभापती मिलिंद कोंडू सपकाळे, संगीता दांडेकर, प्रभाग समिती सदस्य जयप्रकाश कंखरे, शेखर पाटील, पुरषोत्तम टावरी, फिरोज खान, अजय पाटील, प्रभाग अधिकारी उदय पाटील, भास्कर भावसार, सुनील भोळे, अनिल जोगी उपस्थित होते. सायंकाळी अतिक्रमण विभागाच्या आढावा बैठकीत नागरिकांना त्रास होणार नाही, तसेच नवीन अतिक्रमण वाढणार नाही, याची खबरदारी घ्यावी. हॉकर्स झोनबाबतच्या प्रस्तावास त्वरित मंजुरी मिळण्याबाबत शासनाकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासन महापौर पाटील यांनी दिले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.