आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवृत्त पाेलिसाकडून रावेरच्या तहसीलदारांवर हल्ला

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रावेर (जि. जळगाव)- कुळकायदा शेतजमीन दाव्याचा निकाल विराेधात लागल्याच्या रागातून निवृत्त पोलिस कर्मचाऱ्याने रावेरच्या तहसीलदारांना काठीने मारहाण केल्याची घटना सोमवारी घडली. या घटनेमुळे महसूल कर्मचाऱ्यांमध्ये संताप व्यक्त केला जात अाहे.
सोमवारी सकाळी १० वाजता तहसीलदार कुंदन हिरे हे तहसील कार्यालयातील विविध विभागांच्या कामकाजाचा आढावा घेत होते. संजय गांधी निराधार योजना कार्यालयाजवळ नागरिकांसोबत तहसीलदार चर्चा करत होते. त्याच वेळी सिंदखेड (ता. रावेर) येथील रहिवासी तथा निवृत्त पोलिस कर्मचारी प्रल्हाद वामन पाटील (वय ६५) यांनी पाठीमागून येत तहसीलदार हिरे यांच्या डोक्यावर हातातील काठीने जोरदार वार केला. त्यामुळे क्षणभर काय झाले हे हिरे यांना व उपस्थित लाेकांना समजले नाही. मात्र काही क्षणातच कर्मचारी व उपस्थित लाेकांनी पाटील यांच्या हातातील काठी तत्काळ हिसकावून घेतली. तसेच पाेलिसांना बाेलावून पाटील यांना त्यांच्या ताब्यात देण्यात अाले.
याप्रकरणी तहसीलदार कुंदन हिरे यांच्या फिर्यादीवरून शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी प्रल्हाद पाटील यांच्या रावेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला अाहे. दरम्यान, रावेर न्यायालयाचे न्यायाधीश अखिलेश जैन यांनी अाराेपीला एक दिवसाची पाेलिस काेठडी सुनावली अाहे. महसूल कर्मचाऱ्यांवरील हल्ल्यांच्या घटनांत राज्यात दिवसेंदिवस वाढ हाेत असल्याने महसूल कर्मचाऱ्यांमध्ये संतापाची भावना व्यक्त हाेत अाहे.

निकालाचाच राग
३० मार्चला तहसीलदार कुंदन हिरे यांनी पाटील यांच्याविरुद्ध निर्णय दिला हाेता. या निर्णयाची प्रत त्यांना २० एप्रिलला प्राप्त झाली. त्यात विराेधात निकाल लागल्याचा राग पाटील यांच्या मनात खदखदत होता. याच कारणावरून त्यांनी तहसीलदारांवर हल्ला केल्याचे समाेर अाले अाहे.

लेखणी बंद आंदोलन
तहसीलदार हिरे यांच्यावरील हल्ल्याचा महसूल कर्मचारी संघटनेने निषेध केला आहे. सोमवारी पोलिस निरीक्षक सुनील कुराडे व प्रांताधिकारी डॉ.अरविंद अंतुर्लीकर यांना निषेधाचे निवेदन देण्यात आले. तलाठी, मंडळाधिकारी, नायब तहसीलदार, शिपाई आणि कर्मचाऱ्यांनी सोमवारी लेखणी बंद आंदोलन केले.