आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सेवानिवृत्त प्राध्यापकाच्या बंगल्यात चोरी; चार लाखांचा ऐवज लंपास

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चाळीसगाव - शहरातील भडगाव रोडजवळील विवेकानंदनगरात सेवानिवृत्त प्राध्यापकाच्या घरी दि. 16 रोजी रात्री 9 ते 12 वाजेच्या सुमारास घरफोडी झाली. यात 4 लाख 22 हजारांचा ऐवज लंपास करण्यात आला. चोरट्यांनी कडी-कायंडा तोडून घरात प्रवेश केला.

के.आर.कोतकर कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून नुकतेच सेवानिवृत्त झालेल्या रमेश प्रेमराज चोप्रा (वय 60) यांचा विवेकानंदनगरात प्रशस्त बंगला असून ते शनिवारी सकाळी साडेपाच वाजेला रेल्वेने मुंबईला गेले असताना चोरट्यांनी डाव साधला. त्यांचे कुटुंबीय पुणे येथे मुलाकडे गेले होते. चोरट्यांनी बॉक्सचा पलंग, शोकेस, कपाट यातून सामान अस्ताव्यस्त करून रोख रक्कम व दागिने तपासले. डब्यांमधील दागिने काढून त्यांनी रिकाम्या डब्या तेथेच सोडून दिल्या.

याशिवाय कडी-कोयंडा तोडण्यासाठी करवतीचा वापर केल्याचा संशय आहे. चोप्रा हे शनिवारीच आपले काम आटोपून रात्री साडेबारावाजेला घरी परतले. त्यांना बंगल्यात प्रवेश करतानाच दरवाजाचा कडी-कोंयडा तुटलेला दिसला. त्यांनी तातडीने ही घटना पोलिसांना कळवली.

...असा गेला ऐवज
88 हजार रुपये किमतीच्या 4 बांगड्या, 66 हजारांच्या 3 पाटल्या, 44 हजारांचे सोन्याचे लॉकेट, 22 हजारांच्या 2 अंगठ्या, 56 हजारांचे 4 चांदीचे ताट, 6 हजार 600 रुपयांचे सोन्याचे टॉपस्, 1 लाख 40 हजार रुपये रोख असा एकूण 4 लाख 22 हजार रुपयांची धाडसी चोरी केली. याप्रकरणी चाळीसगाव पोलिसांत अज्ञात चोरट्यांविरोधात चोरीचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
श्वान पथक दाखल
घटनास्थळी जळगाव येथील श्वान पथकाला पाचारण करण्यात आले होते. अप्पर पोलिस अधीक्षक संदीप जाधव, उपविभागीय पोलिस अधिकारी केशव पातोंड, पोलिस निरीक्षक संजय देशमुख यांनी भेट देऊन घटनेचा पंचनामा केला. भरवस्तीत व गजबजलेल्या ठिकाणी झालेल्या धाडसी चोरीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले आहे. याबाबतीत नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. श्वान पथकाला चोरट्यांचा मार्ग गवसला नाही.