आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महसूल यंत्रणेचे आजपासून कामकाज;सहा मागण्या मान्य

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धुळे - महसूल यंत्रणेतील वर्ग तीन आणि चार कर्मचा-यांच्या सहा मागण्या शासनाने मान्य केल्या. प्रलंबित मागण्यांसाठी महसूल कर्मचा-यांकडून बेमुदत काम बंद आंदोलन 1 ऑगस्टपासून सुरू होते. मागण्या मान्य झाल्याने आंदोलन मागे घेण्यात आले आहे. या आंदोलनामुळे विद्यार्थी, नागरिकांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागले.

राज्य महसूल कर्मचारी संघटनेकडून कर्मचा-यांच्या विविध मागण्यांसाठी राज्यव्यापी आंदोलन सुरू होते. त्यात गेल्या महिन्यात भोजन काळात निदर्शने, लेखणी बंद आणि धरणे आंदोलन करण्यात आले. तरीही शासनाने मागण्यांकडे लक्ष न दिल्याने 1 ऑगस्टपासून बेमुदत काम बंद आंदोलन आणि धरणे आंदोलन करण्यात आले. संपामुळे गेल्या आठ दिवसांपासून महसूल यंत्रणेचे कामकाज ठप्प झाले होते. काल मंगळवारपासून राजपत्रित अधिका-यांनीही आंदोलनात सहभाग घेतल्याने संपूर्ण महसूल यंत्रणेचे काम बंद पडले होते. कर्मचारी संपावर असल्याने यंत्रणेत कोणतेही कामकाज होत नसल्याने विद्यार्थ्यांना दाखल्यासाठी आणि नागरिकांना आपल्या विविध कामांबाबत अडचणी निर्माण झाल्या. कार्यालयात केवळ अधिकारी वर्ग उपस्थित होता. त्यांच्याकडून नियमित कामाशिवाय अन्य कोणतेही काम होत नसल्याने सर्वसामान्यांची चांगलीच अडचण झाली. काल मंगळवारपासून तहसीलदार, प्रांताधिकारी कार्यालयातील कामकाज पूर्णपणे बंद झाल्याने त्यात अधिक भर पडली. दरम्यान, बुधवारी मुंबईत शासन आणि कर्मचारी संघटनेच्या पदाधिका-यांची बैठक होऊन त्यात सहा मागण्या मान्य करण्यात आल्या. दरम्यान कर्मचा-यांकडून आज दिवसभर थाळीनाद आंदोलन करण्यात आले. उद्या गुरुवारपासून नियमित कामकाज सुरू होणार आहे.
या मागण्या मान्य
० नायब तहसीलदार ग्रेड 4600 तत्काळ करणे.
० लिपिकांचे पदनाम ‘महसूल सहायक’ असे करणे.
० कोतवालांना चतुर्थश्रेणी कर्मचा-यांचा दर्जा देणे.
० शिपायांना सायकलऐवजी मोटारसायकल अग्रीम देणे.
० नायब तहसीलदारांची पदे पदोन्नतीने भरण्यास मान्यता.
० शिपाई संवर्गातून तलाठी संवर्गात पदोन्नती देणे.