(भाजप नगरसेवकांच्या बैठकीत बोलताना महसूलमंत्री एकनाथ खडसे. सोबत खासदार रक्षा खडसे, आमदार गुरुमुख जगवानी, सुरेश भोळे आदी)
जळगाव- भारतीय जनता पक्षातील नेत्यांमध्ये महापालिकेतील हालचालींवरून गेल्या काही दिवसांपासून खदखद सुरू आहे. त्याचा स्फोट रविवारी महसूलमंत्री एकनाथ खडसेंच्या उपस्थितीत झालेल्या नगरसेवकांच्या बैठकीत झाला. इकडे-तिकडे बडबड करतात, असा टोला हाणत भविष्यात उमेदवारीवरच बोट ठेवत खडसेंनी नगरसेवकांची चांगलीच खरडपट्टी काढली.
अजिंठा विश्रामगृहात महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्या उपस्थितीत सायंकाळी ५.३० वाजता महापालिकेतील भाजपच्या नगरसेवकांची बैठक झाली. या वेळी आमदार सुरेश भोळे, आमदार गुरुमुख जगवानी यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. गाळेकराराच्या प्रस्तावाच्या वेळेस भाजप नगरसेवकांनी त्याला विरोध केल्याचा मुद्दा ताजा असताना या बैठकीत खडसेंनी जुन्या संदर्भांना हात घालत कानपिचक्या दिल्या. काही जण अन्य पक्षातून आले. त्यांना उमेदवारी दिली. आजारी असतानाही जीवाचे रान करून प्रचार केला, असे खडे बोल सुनावत खडसेंनी आगामी काळात राजकारण करायचे असेल तर शिस्तीला धरून वागावे लागेल, असा इशारा िदला. बैठकीनंतर सर्वच नगरसेवकांचे चेहरे पडलेले होते.
आयुक्तांकडून माहिती
ठरावक्रमांक १३५ संदर्भात अडचणी असल्याचे नगरसेवकांनी सांगितल्यानंतर खडसेंनी आयुक्त संजय कापडणीस यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क केला. ठराव क्रमांक १३५ अद्याप कायम असल्याने नवीन ठराव करणे शक्य नसल्याचे स्पष्ट झाले. गाळेधारकांनीही ठराव क्रमांक १३५ रद्द करण्याची मागणी लावून धरली. हा ठराव रद्द झाल्यास प्रशासन नवीन प्रस्ताव अाणू शकते, असाही मुद्दा पुढे आला. खंडपीठाने दिलेल्या निकालात जूनपर्यंत गाळेधारकांना मुदत दिली आहे. त्यापूर्वी नवीन ठराव झाल्यास काही तरी मार्ग निघू शकतो अशीही चर्चा झाली.
गाळेधारकांनी घेतली महसूलमंत्र्यांची भेट
गाळेकराराबाबत पालिकेकडून सुरू असलेल्या हालचालींबाबत गाळेधारकांनी महसूलमंत्री खडसेंची भेट घेतली. जुन्या आठवणींना उजाळा दिला. तसेच जूननंतर पालिकेने कारवाई केल्यास आम्ही रस्त्यावर येऊ. त्यामुळे दुकानांना कुलूप लावून चाव्या तुमच्या ताब्यात देण्याची तयारीही बोलून दाखवली.