आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहरात भारनियमनास अडथळा बड्यांच्या वीजचोरीमुळेच

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - शहरातील दहा फीडरवरील भारनियमनमुक्तीचा प्रस्ताव वीजगळती व वसुलीच्या सरासरीवर अडकून पडला आहे. परिणामी, भारनियमन कमी होण्याऐवजी त्यात वाढच सुचविण्यात आली आहे. शहरातील सधन भागातच वीजचोरीचे प्रमाण अधिक असल्याने या भागात फीडरनिहाय भारनियमन अशक्य झाले आहे. आदर्शनगर, गणपतीनगर या भागातील मोठय़ा बंगल्यांमधूनच वीजचोरीचे प्रकार उघडकीस येत आहेत. उच्चभ्रू वस्तीसह सधन कुटुंबातील व्यक्तींकडे वीजचोरीचे प्रमाण अधिक असल्याचे दिसून आले आहे. प्रगत भागातून चार दिवसांत आठ ते दहा सधन ग्राहकांवर भरारी पथकाने कारवाई केली असल्याची माहिती ‘क्रॉम्प्टन’चे युनिट हेड डॉ.व्ही.पी.सोनवणे यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना दिली.

आता प्रगत भागही करणार लक्ष्य

नवीन प्रस्तावात आदर्शनगरचा भाग ‘ग’ गटात आहे. या भागाशी तांबापुरा व परिसरातील काही भाग जोडला गेला आहे. तांबापुरा भागात वीजगळती अधिक आहे. त्यामुळे आदर्शनगरचा प्रगत भाग भारनियमनमुक्तीपासून दूर राहिला आहे. मात्र आता या प्रगत भागातूनच वीजचोरी उघड झाल्याने खरी स्थिती बाहेर येऊ लागली आहे.


बदनामीच्या भीतीने बिल चुकते
वीजगळती कमी करण्यासाठी आजवर शहरातील गेंदालाल मिल, समतानगर, हरिविठ्ठल, कांचननगर या भागांनाच लक्ष्य केले आहे. मात्र, उच्चभ्रू वस्तीत राहूनही चोरीची वीज वापरणार्‍यांकडे लक्ष देण्यात आम्ही गाफील राहिल्याचे क्रॉम्प्टनच्या सूत्रांनी सांगितले. सोमवारी आदर्शनगर भागातील एका बंगल्यामध्ये मीटरबाहेरून सर्व्हिस वायरद्वारे वीजजोडणी केल्याचा प्रकार उघडकीस आला. कंपनीच्या अभियंत्यांनी ही वीजचोरी रोखतानाच संबंधिताविरुद्ध जिल्हापेठ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्याची तयारीही केली. मात्र, संबंधित ग्राहकाने बदनामीच्या भीतीने तत्काळ कार्यालयात येऊन दंडासह वीजबिल भरल्याने वाद सामोपचाराने मिटविण्यात आला. संबंधित ग्राहकाविषयी माहिती देण्याचे मात्र कंपनीच्या सूत्रांनी टाळले. या प्रकाराने कंपनीने पॉश वस्तीतील वीजचोरीकडे लक्ष दिले आहे.


प्रगत भागात पथके नियुक्त
वीजचोरीमुळे नागरिक भारनियमनापासून वंचित राहत आहेत. प्रगत भागातील बड्यांच्या घरामधूनच वीजचोरी उघड होत आहे. बंगल्यांमधील विजेची तपासणी करण्यासाठी पथके नियुक्त केली जाणार आहेत. विजेची चोरी करणार्‍यांवर 135 कलमांतर्गत गुन्हे दाखल केले जातील. डॉ.व्ही.पी. सोनवणे, युनिट हेड, क्रॉम्प्टन