आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धुळे शहरात रिक्षातून आणला जाणारा मद्यसाठा जप्त

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जप्त केलेला मद्यसाठा. - Divya Marathi
जप्त केलेला मद्यसाठा.
 धुळे- शहरात विक्रीसाठी येणारा मद्यसाठा देवपूर पोलिसांच्या पथकाने जप्त केला. ही कारवाई रविवारी पहाटे करण्यात आली. एका रिक्षामधून हा मद्यसाठा विक्रीसाठी आणला जात होता. या प्रकरणी दोघांविरुद्ध देवपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
 
शिरपूरहून निघालेल्या रिक्षातून ( क्र. एमएच १८ डी/८४३८) अवैधरीत्या मद्याची वाहतूक केली जात असल्याची माहिती देवपूर पोलिसांच्या पथकाला मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी रविवारी पहाटे चार वाजेच्या सुमारास नगावबारीजवळील उड्डाण पुलाजवळ सापळा रचून रिक्षा अडवली. या वेळी रिक्षामधील राजेश माणिक सुपनर (३५), महेंद्र पुंडलिक धोंडे (२९, दोघे रा. राऊळवाडी, चितोड रोड, धुळे) यांना विचारणा केल्यावर त्यांना समाधानकारक उत्तर देता आले नाही. त्यामुळे पोलिसांनी रिक्षाची तपासणी केली. या वेळी सीटच्या मागे दारूचे पाच बॉक्स आढळले. त्यात १४ हजार ४०० रुपयांची मॅकडोनाल्ड व्हिस्की, सात हजार ९२० रुपयांची रॉयल स्टॅक व्हिस्की, सहा हजार रुपयांची मास्टर ब्लँड, सहा हजार ७२० रुपयांची इम्पेरियल ब्ल्यू कंपनीचे मद्य जप्त करण्यात आले. कारवाईत सुमारे ३५ हजार ४० रुपयांचा मद्यसाठा, २५ हजार रुपयांची रिक्षा तसेच प्रत्येकी दोन हजार रुपये किमतीचे दोन मोबाइल जप्त करण्यात आले. जप्त मुद्देमालाची किंमत सुमारे ६४ हजार ४० रुपये आहे. या प्रकरणी दोघांविरुद्ध देवपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
 
बातम्या आणखी आहेत...