आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

​रिक्षाचालकाची प्रवासी दांपत्याला मारहाण; पत्नीचा केला विनयभंग

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - रिक्षाने रेल्वेस्थानकावर जाणार्‍या प्रवासी दांपत्याला रिक्षाचालकासह दोघांनी कानळदा रस्त्यावर नेऊन पतीला मारहाण करत पत्नीचा विनयभंग केला. एवढेच नव्हे तर महिलेकडील 1100 रुपये आणि सात हजार रुपयांचा मोबाइल पळवून नेला. ही धक्कादायक घटना रविवारी रात्री साडेअकरा वाजता घडली. याप्रकरणी सोमवारी शहर पोलिस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी मनोज विजय रतवेकर (वय 22, राहणार गेंदालाल मिल) याला सोमवारी संध्याकाळी ताब्यात घेण्यात आले असून त्याची मंगळवारी फिर्यादी महिलेसमोर ओळख परेड होणार आहे.

भडगाव तालुक्यातील पिंपळगाव थडीचे येथील हे दांपत्य आहे. रविवारी दुपारीअशोक टॉकीज येथून रेल्वेस्थानकावर जाण्यासाठी ते रिक्षात बसले. रिक्षामध्ये चालकासह दोन जण आधीच बसलेले होते. चालकाने रिक्षा रेल्वेस्थानकावर न नेता कानळदा रस्त्यावर एका निर्मनुष्य जागी नेली. त्यानंतर तिघांनी महिलेच्या पतीला रिक्षातून खाली उतरवून मारहाण करत महिलेचा विनयभंग केला. आरडा-ओरड केल्यानंतर तिघे कानळद्याकडे पळून गेले. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात विनयभंगासह जबरी लुटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलिस निरीक्षक अशोक पवार तपास करीत आहेत.

पोलिसांपुढे आव्हान : गेल्या आठवडाभरात पोलिसांनी अवैध धंद्यावर छापे मारून गावठी दारू, सट्टा, जुगाराच्या पेढ्यांवर कारवाया केल्या. मात्र, दुसरीकडे शहरात चोरी, महिलांचे विनयभंग ह्या घटना भरदिवसा घडत आहेत. पोलिसांचा वचक संपल्याची स्थिती शहरात निर्माण झाली आहे. अवैध धंद्यावर लक्ष केंद्रित केलेल्या पोलिस प्रशासनाला आता चोर्‍या, घरफोड्या करणार्‍या गुन्हेगारांना अटक करून त्यांच्यावर वचक निर्माण करण्याची गरज असल्याचे बोलले जात आहे.

पोलिस उपअधीक्षकांनी दिली घटनास्थळाला भेट
घटनेची माहिती मिळाल्यावर पोलिस उप अधीक्षक प्रशांत बच्छाव यांनी रविवारी रात्री अडीच वाजता घटनास्थळी जाऊन पाहणी करून सूचना दिल्या. सोमवारी संध्याकाळी शहर पोलिस ठाण्याचे प्रीतम पाटील, मिलिंद सोनवणे, अमोल विसपुते व धनराज शिरसाठ यांनी मनोज रतवेकर याला ताब्यात घेतले. त्याची मंगळवारी फिर्यादीसमोर ओळख परेड होईल.

विनानंबरप्लेटची रिक्षा
हा प्रकार घडल्यानंतर पीडित दांपत्याने रिक्षाचा क्रमांक नोंद करण्याचा प्रयत्न केला. मात्र, रिक्षावर नंबरप्लेट नव्हती. वाहतूक पोलिसांकडून शहरात विचित्र नंबरप्लेटच्या वाहनांवर कारवाई सुरू आहे; तर दुसरीकडे मात्र विना नंबरप्लेटच्या रिक्षा बिनदिक्कत धावत असल्याचे या घटनेमुळे उघडकीस आले आहे.

जळगाव शहर बनते असुरक्षित
गेल्या दोन दिवसांत शहरात गुंडाराज सुरू असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. शनिवारी भरदिवसा जबरी लूट आणि घरफोडीची घटना घडली. एका घटनेत पहाटे 5 वाजता तलवारीचा धाक दाखवत 6 लाख रुपयांची रोकड लंपास झाली. तर दुसर्‍या घटनेत भरदुपारी 12 वाजेच्या सुमारास अपार्टमेंटमधील बंद घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून घरातून 1 लाख 77 हजार रुपयांचा ऐवज चोरीस गेला. पाठोपाठ रविवारी रिक्षाचालकासह दोघांनी भरदिवसाच दांपत्याला पळवून नेत विनयभंग केला. त्यामुळे शहरातील वातावरण असुरक्षित होत असल्याची प्रचिती नागरिकांना येत आहे.