आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रिक्षाचालकांवर कारवाईसाठी बलात्काराची घटना हवी का?

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - रविवारी रात्री रिक्षाचालकासह दोघांनी दांपत्याला मारहाण करून महिलेचा विनयभंग केल्याची घटना घडली. विशेष म्हणजे, ही रिक्षा विनानंबरची होती. ज्या प्रवाशांच्या जोरावर रिक्षाचालकांच्या कुटुंबांचा उदरनिर्वाह चालतो, त्यांच्यावरच हात घालण्याचा प्रकार काही गुन्हेगारी प्रवृत्तीच्या रिक्षाचालकांनी चालवला आहे. शहरात विनानंबरप्लेट, नाव, बिल्ला आणि ड्रेसकोड नसलेले चालक असतील तर अशा घटनांचा शोध पोलिस लावणार कसा? व प्रवासीही यापुढे रिक्षाचालकांवर विश्वास ठेवतील का? असे प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाले आहेत.
वाहतुकीच्या नयिमांचे पालन न करणाऱ्या रिक्षाचालकांवर पोलिस आणि आरटीओ विभागाचा वचक न राहिल्याने गुन्हेगारी प्रवृत्तीचे रिक्षाचालक मुजोर झाले आहेत. त्यामुळे याप्रकरणी कठोर कारवाईसाठी पोलिस प्रशासनाला आता बलात्कारासारख्या घटनेची प्रतीक्षा आहे का? असा संतप्त सवाल उपस्थित केला जात आहे.

जळगाव शहरात 4,390 रिक्षांना परमीट देण्यात आले आहे. प्रत्यक्षात 10 हजारच्या आसपास रिक्षा व्यवसाय करीत असल्याचे चित्र आहे. त्यातच रिक्षाचालकांकडून कुठे ओव्हरसीट, कुठे प्रवाशांशी हुज्जत घालणे, तर कुठे महिला व मुलींची छेड काढण्याचेही प्रकार घडत आहेत. रिक्षाचालकांवर आताच कारवाई केली नाही, तर भविष्यात परवानगीपेक्षा दहापट रिक्षा शहरात दिसतील. त्यात जे जुने मुख्य चालक आहेत व ज्यांचे उदरनिर्वाहाचे साधन रिक्षाच आहे त्यांच्यावरही अन्याय होणार आहे. याशिवाय गुन्हेगारी प्रवृत्तीही वाढीस लागणे शक्य आहे. जळगाव शहरात मोठे रेल्वे स्टेशन आहे. त्यामुळे जिल्हाच काय, राज्यभरातून प्रवासी ये-जा करतात. शहरासाठी हे प्रवासी अतिथी असतात व त्यांचा तसाच आदर केला पाहिजे.
रिक्षाचालकांसाठी हे प्रवासी तर आर्थिक वाहिनी असते. त्यांनी तर त्यांच्याशी अत्यंत आपुलकी आणि प्रेमाने वागले पाहिजे. रविवारसारख्या घटनांची पुनरावृत्ती होऊ लागली, तर रिक्षाचालकांसोबत शहराचे नावही बदनाम होईल. त्यामुळे पोलिस आणि आरटीओने तत्काळ रिक्षाचालकांना शिस्त लावणे गरजेचे आहे. तसेच विनापरवाना रिक्षा चालवणाऱ्यांवर कारवाई करून प्रवाशांना सुरक्षा प्राप्त करून देण्याची आवश्यकता आहे.
७५ टक्के परवाने भाडेतत्त्वावर
शहरात धावत असलेल्या रिक्षांपैकी ७५ टक्के रिक्षांचे परवाने भाडेतत्त्वावर देऊन दुसरेच लोक व्यवसाय करीत आहेत. अशा परिस्थितीत होणाऱ्या कोणत्याही दुर्घटनेची जबाबदारी कोणावर राहील? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
काय म्हणतो कायदा?
कायद्यानुसार रिक्षा आणि रिक्षाचालकांसाठी आदर्श सूची तयार करण्यात अाली आहे. ज्या व्यक्तीच्या नावावर परवाना आहे त्याच व्यक्तीने व्यवसाय करणे बंधनकारक आहे. विनापरवाना रिक्षा चालवल्यास 2 हजार रुपये दंडाची तरतूद आहे. तसेच खाकी रंगाचा गणवेशही सक्तीचा आहे. गणवेश नसल्यास 100 रुपये दंड आहे. तसेच वाहन चालवण्याचे लायसन्स सोबत नसल्यास 100 रुपये, तर लायसन्सच काढले नसल्यास 300 रुपये दंड आहे. गणवेशावर उजव्या बाजूला छातीवर बॅच-बिल्ला लावणे आवश्यक आहे. नसल्यास 100 रुपये दंड आहे.
परिसरातूनही येतात रिक्षा
ग्रामीण भागाचे परवाने दिलेल्या रिक्षांना शहरात येण्यास बंदी आहे. मात्र, शहरात आजूबाजूच्या भागातील रिक्षाही सर्रास व्यवसाय करीत आहेत.