जळगाव- जळगावातील खड्डेमय रस्त्यात दणके खात प्रवास करत अनेक रिक्षाचालक महापालिकेच्या नावाने बोटे मोडतात. अशी परिस्थिती असतानादेखील प्रवाशांना चांगली सुविधा मिळावी, म्हणून जळगावातील रिधूरवाड्यातील इम्रान अहमद पिंजारी हा युवक धडपडत आहे. तो रिक्षा चकाचक अन् आकर्षक ठेवण्याचा छंद जोपासण्यासह प्रवाशांना अत्याधुनिक सुविधा देत आहेत. आता तर या छंदवेड्याने रिक्षामध्ये चक्क प्रवाशांसाठी टीव्ही, मोबाईल चार्जर, फायर एक्स्टिंग्यूशर, पंखा, वृत्तपत्र, आरामदायक सीट पायतानची सोय उपलब्ध करून दिली आहे. अपघात होऊ नये, म्हणून बॅक कॅमेरा लावला असून ही रिक्षा जळगावातील प्रवाशांसाठी आकर्षण ठरू पाहत आहे.
आठ वर्षांपासून रिक्षा चालवणाऱ्या रिधूरवाड्यातील 25 वर्षीय इम्रान अहमद पिंजारी या युवकाला रिक्षा टापटीप ठेवण्याचा प्रवाशांना चांगल्या सुविधा देण्याचा अनोखा पण केला आहे. त्याचा हा छंद जोपासण्यासाठी तो स्वत: पदरमोड करत वाटेल ती किंमत मोजण्यास तयार असतो. गेल्या सहा महिन्यांपूर्वी त्याने प्रवाशांचा प्रवासादरम्यान; टीव्ही पाहण्यासह विविध हायटेक सुविधा मिळाव्या, म्हणून रिक्षा सजवण्याची कल्पना केली होती. ती कल्पना प्रत्यक्षात उतरवण्यासाठी त्याने सुरुवातीला मालेगाव येथून टप आरामदायी सीट तयार करून आणले. नंतर जळगावातून इतर वस्तूंची खरेदी करून त्या रिक्षात बसवल्या आहेत. त्यामुळे ही रिक्षा जळगावकरांच्या पसंतीस उतरू पाहत आहे.
रिक्षाच्या मागील बाजूस बसवलेला कॅमेरा
मला रिक्षा टापटीप ठेवण्यासह प्रवाशांना चांगल्या सुविधा देण्याचा छंद आहे. मी प्रवाशांना देत असलेल्या सुविधांमुळे ते खूश राहतात, याचा मला आनंद वाटतो. आगामी काळातदेखील मला रिक्षामध्ये काही वेगवेगळे बदल करून प्रवाशांना उत्कृष्ट सेवा द्यायची आहे. - इम्रानपिंजारी, रिक्षाचालक