जळगाव- बॅँकेतून काढून आणलेले पैसे मोटारसायकलच्या डिक्कीतून काढून घरात नेत असताना दोघा मोटारसायकलस्वार चोरट्यांनी हाताला हिसका देऊन लांबविले. थैलीत दीड लाख रूपये होते. ही घटना खोटेनगरातील मानवसेवा शाळेजवळ सोमवारी दुपारी 2 वाजेच्या सुमारास घडली. नागरिकांच्या पाठलागानंतरही हे दोघे दुचाकीस्वार तरुण पळून जाण्यास यशस्वी झाले. या प्रकरणी रामानंद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ट्रान्सपोर्टनगरात गॅस टॅँकरचा व्यवसाय असलेले संजय जयराम पाटील (वय 45) हे नवीपेठेतील महाराष्ट्र बॅकेतून दीड लाख रुपये काढून घराकडे निघाले. काहीवेळ डॉ. ज्योती गाजरे यांच्या दवाखान्यात थांबून त्यांनी रक्त व लघवी तपासली. तेथून दीड लाख रुपये असलेली आर.एल.ज्वेलर्सची पिशवी त्यांनी डिक्कीत ठेवली. तेथून दुचाकीने (एमएच-19 एएच 3161) ते घराकडे निघाले. 1.45 वाजता घरी पोहोचले. त्यांनी डिक्कीत दीड लाख रुपये ठेवलेली कॅरीबॅग काढली, त्याचवेळी दुचाकीवर वेगाने आलेल्या दोन तरुणांनी पाटील यांच्या हाताला हिसका देऊन कॅरीबॅग लांबवली.
चोरट्यांना पकडण्याचा अयशस्वी प्रयत्न
या घटनेनंतर संजय पाटील यांनी आरडाओरड केली असता, एका बुलेटस्वाराने त्या दोघांचा पाठलाग करण्याचा प्रयत्नही केला. मात्र, दुचाकीस्वार तरुण पिंप्राळ्याच्या रस्त्यावर दिसेनासे झाले. या तरुणांपैकी एकाने लाल रंगाचा तर दुसर्याने चॉकलेटी रंगाचा टी-शर्ट घातला असल्याचे पाटील यांनी सांगितले. घटनेनंतर पाटील यांनी रामानंद पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.