आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रिक्षांच्या इलेक्टॉनिक मीटरमुळे ‘कही खुशी, कही गम’

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर राज्य शासनाने ऑटो रिक्षांना इलेक्टॉनिक मीटर बसविण्याची सक्ती केली आहे.जिल्ह्यातील रिक्षाचालक-मालकांना 15 जुलैपर्यंत सुट देण्यात आली आहे. मीटरच्या सक्तीनंतर रिक्षाचालकांना काही मार्गांवर फायदा तर काही मार्गांवर तोटा सहन करून व्यवसाय करावा लागणार असल्याची परिस्थिती शहरात निर्माण होणार आहे. ज्या मार्गांवर शेअर ए रिक्षा प्रस्तावांना मान्यता देण्यात आली, अशा मार्गावर मीटर सक्ती नसते. मात्र, मीटरच्या सक्तीप्रमाणे प्रवाशांना घरापर्यंत सोडण्याचा नियम असतो.
जळगाव शहराचा व्याप अवघ्या पाच ते सात किलोमीटरच्या परिघात पसरलेला आहे. त्यामुळे ऑटोरिक्षा आणि टॅक्सीच्या वाहतुकीच्या व्यवसायात इतर मोठय़ा शहरांच्या तुलनेत जळगाव अगदी लहान शहर आहे. अशा परिस्थितीत मीटरनुसार भाडे आकारले गेले तर काही मार्गांवर सध्या आकारण्यात येणार्‍या भाड्यात कमी-अधिक प्रमाणाचा फरक पडणार आहे. नागरिकांसह रिक्षाचालक-मालकांना बुचकळ्यात टाकणारा हा नवीन उपक्रम ठरणार आहे. पण प्रत्येक नवीन गोष्ट आत्मसात केल्यानंतरच ती हळूहळू सुरळीत होत असते.
रिक्षाचालकांची तयारी - आरटीओ अधिकार्‍यांचा कारवाईचा बडगा वाचविण्यासाठी रिक्षाचालक-मालकांनी इलेक्ट्रानिक मीटर बसविण्याची तयारी दर्शविली आहे. प्रवाशांनी मागणी केल्यास त्यांना मीटरनुसार भाडे आकारावे लागणार आहे. काही मार्गावर शेअर ए रिक्षा प्रमाणे भाडे आकारण्यात येईल, या नियमांचे काटेकोरपणे पालन केल्यास रिक्षाचालकांसह नागरिकांना सोईचे होऊ शकते.
प्रवाशांचा फायदा - मीटरप्रमाणे भाडे आकारले गेले तर प्रवाशांना कमीत-कमी 15 रुपयांप्रमाणे रिक्षा उपलब्ध होईल. मीटरच्या दोन रीडिंगच्या आत प्रवास करावयाचा असल्यास ते परवडणार आहे. कारण रिक्षात बसलेल्या तीन प्रवाशांना मिळून रीडिंगप्रमाणे भाडे देता येते. त्यामुळे दोन रीडिंग मीटर फिरल्यास रिक्षात बसलेल्या तीन व्यक्तींना केवळ 15 रुपये अदा करावे लागतील. लांबच्या प्रवासास मात्र मुळातच रीडिंगचे भाडे जास्त असल्यामुळे त्याचा फायदा होऊ शकत नाही.