आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाचो-यात दंगल, आठ जखमी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाचोरा (जि. जळगाव) - गेल्या आठ दिवसांपासून दोन गटांमध्ये सुरू असलेल्या वादाचे पर्यावसन गुरूवारी दंगलीत झाले. दोन्ही गटातील दंगेखोरांनी तुफान दगडफेक, जाळपोळ करून शहरात दहशत निर्माण केली होती. यात आमदार किशोर पाटील यांच्यासह अन्य काहींच्या वाहनांचे नुकसान झाले तर पाच वाहने जाळण्यात आली. दगडफेकीत दोन पोलिस अधिकारी व चार पोलिस कर्मचा-यांसह ८ जण जखमी झाले. जमावाला आटाेक्यात आणण्यासाठी शहरात मोठा पोलिस फौजफाटा तैनात करण्यात आला होता.

शहरातील बाहेरपुरा भागातून दाऊद तस्लीम बागवान (वय १६) हा बुधवारी घराकडे जात असताना त्याला व त्याच्या मित्रांना मारुती व्हॅनमधून आलेल्या पाच-सहा तरुणांनी अडवून मारहाण केली होती. या घटनेनंतर शहरात रात्रभर तणावपूर्ण शांतता होती. गुरुवारी सकाळी ८ वाजता पुन्हा हनुमान मंदिराजवळ दोन तरुणांमध्ये बाचाबाची झाली व या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. त्यामुळे दुकाने बंद होऊन धावपळ सुरू झाली. तसेच शहरात अफवांचे पेव फुटले. आठवडे बाजार, गांधी चौक, जामा मशीद परिसर या भागात दोन्ही गटांतील समाजकंटकांनी दगडफेक केली, काचेच्या बाटल्या भिरकावल्या. दुपारी १२ वाजेपर्यंत ही दंगल सुरू होती. काही वाहनांना आगही लावण्यात आली. दरम्यान, पोलिसांचा मोठा फौजफाटा रस्त्यावर उतरल्यानंतर त्यांनी दंगेखोरांना काबूत आणण्याचे प्रयत्न केले.

केवळ १०० पोलिस
दंगलीमुळे जळगाव, भडगाव, कासोदा व जामनेर येथूनही पोलिस बंदोबस्त मागवण्यात आला. मात्र, प्रारंभी एक तास केवळ १०० पोलिस सहा भागांतील दंगलखोरांवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत होते. त्यानंतर टप्प्याटप्प्याने दुसरीकडील पोलिस शहरात दाखल झाले. त्यामुळे परिस्थिती काबूत ठेवण्यास चार तास लागले.

दुकानांमध्ये लूट
दंगलखोरांनी आठवडी बाजारात मोटारसायकल, महिंद्रा पिकअप, गांधी चौकात इंडिका कार व दोन मोटारसायकलींची जाळपोळ केली. बाजारपट्ट्यातील इमारतीवर, विजय स्टील सेंटरवर दगडफेक करून दोन फळ दुकानांचीही मोडतोड केली. दंगलखोरांनी सफरचंदाच्या पेट्या, दुकानांमधील वजनकाटे, पैसे लुटले.