आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भुसावळमध्ये दंगलीची अफवा; सिंधी कॉलनीसह वाल्मीकनगरात बंदोबस्त

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भुसावळ- शहरातील बाबा तुलसीदास मार्केटमधील दगडफेकीच्या घटनेमुळे रविवारी दुपारी तीन वाजता दंगलीची अफवा कानोकानी वार्‍यासारखी पसरली. अवघ्या पंधरा मिनिटातच मॉर्डनरोड, सराफ बाजार, हॉकर्स झोन, कपडा मार्केट, चुडी मार्केट, छत्रपती शिवाजी महाराज व्यापारी संकुल, नवशक्ती आर्केड परिसरातील दुकाने व्यापार्‍यांनी पटापट बंद केली. आरडाओरड व पळापळीमुळे व्यावसायिकांचे नुकसान झाले आहे.

या घटनेच्या पार्श्वभूमीवर सिंधी कॉलनी, वाल्मीकनगर व बाबा तुलसीदास मार्केटमध्ये तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. गजबजलेल्या बाजारपेठ भागात भरदिवसा तलवारी तडपल्याने नागरिकांमध्ये प्रचंड घबराट निर्माण झाली होती. घटनेची माहिती मिळताच अवघ्या पंधरा मिनिटात आमदार संजय सावकारे हे आपल्या अंगरक्षकासह घटनास्थळी दाखल झाले. पोलिस उपअधीक्षक विवेक पानसरे, शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक दिलीप पगारे, बाजारपेठचे निरीक्षक प्रभाकर रायते यांना सोबत घेऊन दोन्ही गटांना शांतता आणि संयम बाळगण्याचे आवाहन केले. माजी नगरसेवक संतोष बारसे, खान्देश विकास आघाडीचे नगरसेवक प्रकाश बतरा यांनीही रस्त्यावर उतरून शांतता प्रस्थापित करण्यासाठी पुढाकार घेतला. बाबा तुलसीदास मार्केटमध्ये सिंधी व्यापार्‍यांवर हल्ला झाल्याची माहिती मिळताच अडीच ते तीन हजार सिंधी समाजबांधव सिंधी कॉलनीच्या प्रवेशद्वारानजीक गोळा होऊन मार्केटकडे चाल करण्यासाठी निघाले होते. ही माहिती मिळताच पोलिस निरीक्षक प्रभाकर रायते यांनी आपल्या सहकार्‍यांसह या जमावाला तेथेच रोखले. वाल्मीकनगराच्या समोरही शेकडोंचा जमाव जमा झाला होता. या घटनेची तीव्रता ओळखून पोलिसांनी सिंधी कॉलनीसह वाल्मीकनगर व घटना जेथे घडली तेथे चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

आठवडे बाजारावर परिणाम नाही
दंगलीची अफवा शहरात वार्‍यासारखी पसरल्याने मुख्य बाजारपेठ बंद झाली होती. मात्र, घटना ज्या ठिकाणी घडली तेथून जवळच असलेल्या आठवडे बाजारात शांतता होती. नुकसानीची भीती असल्याने मात्र, तेथील व्यावसायिकांनी चार वाजेनंतर दुकानांची आवरसावर सुरू केली होती. रात्री उशिरापर्यंत पोलिसांची तीन वाहने शहरात गस्त घालत होती. अतिरिक्त पोलिस बंदोबस्त शहरात तैनात करण्यात आल्यामुळे सध्या तणावपूर्ण शांतता आहे.