आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दंगलग्रस्त भागात होणार ध्वजवंदन!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धुळे- शहराच्या शांततेला ग्रहण लावणारी दंगल घडूच नये यासाठी प्रयत्न झाले पाहिजे. दोन्ही समुदायात विश्वास आणि प्रेमाचे वातावरण तयार होणे आवश्यक आहे. त्यासाठी दंगलग्रस्त भागात 26 जानेवारीला ध्वजवंदनाचा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमात युवकांना सामाजिक ऐक्य टिकविण्यासाठी शपथ देण्यात येईल, अशी माहिती ऑल इंडिया सेक्युलर फोरमचे अध्यक्ष डॉ.सुरेश खैरनार यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

या वेळी भारत बचाव आंदोलनाचे राष्ट्रीय अध्यक्ष फिरोज मिठीबोरवाला, ज्येष्ठ विधिज्ञ निर्मलकुमार सूर्यवंशी, प्रा. रणजित परदेशी, अब्दुल सत्तार शाह, भिकन वराडे आदी उपस्थित होते. डॉ. खैरनार म्हणाले की, धुळे दंगलीनंतर शहरातील शांतता प्रस्थपित होण्यासाठी दोन्ही समाजातून प्रयत्न व्हायला हवेत. दोन्ही समाजामध्ये अद्यापही पुरेपूर संवाद होत नाही. त्यामुळे भाईचारा वाढत नाही. शहरात सलोखा व ऐक्य समितीची स्थापना करणे आवश्यक आहे. या समितीच्या माध्यमातून वर्षभर समाजविधायक उपक्रम राबविण्यात येतील. दंगली घडविणारे तरुणांचा पूर्णपणे उपयोग करून घेत समाजात तेढ निर्माण करत आहेत. शहरात अफवांना ऊत आला असल्यामुळे कोणीही त्यावर विश्वास ठेवू नये. दोन्ही समुदायामध्ये एकात्मतेची भावना रुजणे गरजेचे झाले आहे. यासाठी 26 जानेवारीला दंगलग्रस्त भागात ध्वजवंदन करून तरुण आणि नागरिकांना शपथ देणार असल्याची माहिती डॉ. खैरनार यांनी दिली. शहरात झालेली दंगल पूर्वनियोजित नसल्याचे समोर आले असल्याची माहिती फिरोज मिठीबोरवाला यांनी दिली. मात्र, गोळीबाराच्या घटनेची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.

पीडितांच्या तक्रारी घ्या
दंगलीत मृत पावलेल्या तसेच जखमींच्या कुटुंबांच्या तक्रारी पोलिसांनी नोंदवून घेतल्या पाहिजेत; परंतु पोलिस अधिकारी न्यायालयीन चौकशी सुरू असल्याचे कारण सांगून वेळ मारून नेत आहेत. आझादनगर पोलिस ठाण्यात शनिवारी सायंकाळी पोहोचल्यावर एका कागदावर तक्रार घेण्यात आली. प्रत घेण्याबाबत रविवारी सकाळी बोलावले; परंतु रविवारी पोलिसांनी तक्रार घेतली नसल्याचे सांगून घूमजाव केला. हे संविधानिक नाही. तक्रारीची नक्कलही दिली पाहिजे. यासाठी सर्वोच्च न्यायालयात जावू. अँड. एन. डी. सूर्यवंशी