आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपघातात बळी गेलेल्या खूशला श्रद्धांजली वाहण्यासाठी लोटला जनसागर

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

खूश जैन या चिमुकल्याचा अपघाती मृत्यू झाला. त्याला श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी त्याच्या घरापासून आग्रा रोडवरून काढलेल्या कॅण्डल मार्चमध्ये शालेय विद्यार्थी, महाविद्यालयीन तरुण-तरुणी, व्यापारी, वकील, डॉक्टर्स, शहरातील विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी, राजकीय पक्षांचे पदाधिकारी, महिला आदी स्वयंस्फूर्तीने सहभागी झाले होते. या वेळी प्रत्येकाच्या हातात पेटती मेणबत्ती होती. पुन्हा अशी दुर्दैवी घटना नको म्हणून हजारो नागरिक यानिमित्ताने रस्त्यावर उतरले होते.

एक पाऊल अपघातमुक्तीकडे
अनेकदा चांगलं घडवण्यासाठी आपण वाईटाची वाट पाहात बसतो. धुळे शहरात वाहतुकीला शिस्त लागण्यासाठी आणि अडथळे दूर करण्यासाठी चिमुकल्या खूश जैनचं बलिदानच हवं होतं का? असा प्रश्न समस्त धुळेकरांना विचारावासा वाटतो. पाच वर्षांपूर्वी धुळय़ाच्या बाहेरून जाणार्‍या महामार्गावर नेताजी डे स्कूलच्या बसला अपघात झाला होता. त्यात तीन निष्पाप चिमुकल्यांनी प्राण गमवले होते. त्यानंतरही ना वाहनचालक काही धडा शिकले, ना त्यांच्यावर कारवाई करण्याची क्षमता बाळगणारी यंत्रणा बदलली. जे काही घडतं ते तेवढय़ापुरतं. नव्याची नवलाई संपली की सारे ‘विर्शाम’ अवस्थेत चालले जातात. अपघातानंतर निर्माण होणारी चीड, संताप वाहनांची तोडफोड करण्यापुरताच का सिमीत राहातो? ही चीड अपघाताला जबाबदार ठरणार्‍या घटकांच्या मूळावर घाव घालण्यासाठी का प्रवृत्त करीत नाही? हा संताप अपघाताच्या कारणांनाच नेस्तनाबूत करण्यासाठी का वापरला जात नाही? अपघाताचा भाग बनलेला ट्रक जाळण्यापेक्षा ज्या बेकायदा होर्डिंगमुळे रिक्षाचालकाला ट्रक दिसला नाही त्या आणि तसल्या इतरही होर्डिंग्जची राख करण्याचा विचार का आला नाही संतप्त नागरीकांच्या मनात? हे आणि असे अनेक प्रश्न या निमित्ताने समोर उभे ठाकले आहेत.

खरोखर ‘अपघाता’ने होणारे अपघात आणि मानवी चुकांमुळे, बेजबाबदारपणामुळे होणारे अपघात अशी विभागणी करायची झाली तर चुका आणि निष्काळजीपणामुळे होणारे अपघातच अधिक असल्याचे समोर येईल. रस्ता अपघातात तर सर्वाधिकवेळा मानवी चुका आणि निष्काळजीपणाच कारणीभूत असतो, हे आम्ही सांगण्याची आवश्यकता नाही. वाहतुकीचे नियम सर्वांनीच काटेकोरपणे पाळले आणि आवश्यक ती काळजी घेतली तर अपघात सहसा होत नाहीत; पण हे एकतर्फी घडत नाही. हा निर्धार रस्त्यावरच्या सर्वांनीच करावा लागतो. केवळ रस्त्यारवरच्याच नाही तर सार्वजनिक रस्ता ही आपली खासगी मालमत्ता आहे असं समजून त्या जागेचा गैरवापर करणार्‍यांनीही आपली भूमिका बदलवायला हवी. ते बदलायला तयार नसतील तर सर्वात आधी धडा त्यांना शिकवायला हवा. धुळय़ाचे अपर पोलिस अधीक्षक अखिलेशकुमार यांचे या बाबतीतले विधान वस्तुस्थितीवर प्रखर प्रकाश टाकणारे आहे. दोन दिवसांत पोलिस यंत्रणा रस्ते मोकळे करेल; पण त्यानंतर कोणा बाबा, नाना, अण्णाचा फोन येता कामा नये, असे ते सांगताहेत. खरं तर त्यांचं हे विधान प्रसिद्ध होताच धुळय़ातल्या सर्वच बाबा-नाना-अण्णांनी जाहीरपणे आपली भूमिका स्पष्ट करायला हवी होती आणि अखिलेशकुमार यांच्या पाठीशी उभे राहायला हवं होतं. मात्र, तसं काहीही झालं नाही, हे कशाचं द्योतक आहे? ‘हम नही सुधरेंगे।’ असा निर्धार धुळेकरांनी केला आहे की काय?

केवळ रस्तोरस्ती बेकायदेशीरपणे स्वस्तातले होर्डिंग्ज लावण्याचेच ‘काम’ करणार्‍या ‘चमको’ मंडळींना वेसण घालण्याची, वाहतूक व्यवस्था अधिक सुकर आणि सुरक्षित करण्याची आणि वाहतुकीचे नियम यापुढे काटेकोरपणे पाळण्याचा निर्धार करण्याची हीच वेळ आहे. त्यासाठी ‘दिव्य मराठी’ तुमच्या बरोबर आहे. ‘अपघातमुक्त धुळे’ हे अभियान आम्ही त्यासाठी सुरू करत आहोत. हे अभियान कोणाच्याही विरोधात नाही आणि कोणा एकाच्या सर्मथनार्थही नाही. हे अभियान आहे धुळे शहराला अपघातमुक्त करण्यासाठी एक पाऊल उचलणारं आणि उचलायला लावणारं. चला तर मग, उचलूया एक पाऊल.