आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Road Damage Issue In Bhusawal Vehicle Driver Harassment

धोकेदायक: जळगावरोड झाला खिळखिळा; धुराळ्यात वाहन दिसेना

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भुसावळ- शहरातील सर्वच रस्त्यांची अवस्था बिकट आहे. पालिकेने रस्त्यांच्या कामांच्या निविदा काढल्याने आता दोन महिन्यात रस्त्यांचे रूप पालटेल, अशी नागरिकांना आशा आहे. महामार्गावरून बर्‍हाणपूर, रावेर, सावदा, यावल, चोपडा, शिरपूरकडे जाणारी वाहने जळगाव रोडवरून धावतात. शहरांतर्गत रस्त्यांवरील वाहतूक गृहीत धरून हा रस्ता तयार करण्यात आला. मात्र, रिंगरोडचे काम रखडल्याने या रस्त्याची वाट लागली आहे. रस्त्यावरील अवजड वाहतुकीने दीड वर्षात दोन जणांचा बळी गेला आहे.

गेल्या दोन वर्षांपासून शहरातून जाणार्‍या महामार्गाची दुरवस्था झाली आहे. जळगाव रोडवरील महात्मा गांधी पुतळा ते थेट ग्लोबल हॉस्पिटलपर्यंत दोन्ही बाजूंनी रहिवासी वस्ती आहे. खड्डे बुजवण्यासाठी टाकलेल्या मुरुमाची माती झाल्याने धुराळा उडण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे भविष्यात या भागातील नागरिकांना श्वसनाचे विकार जडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

अवजड वाहतुकीने दीड वर्षात घेतले दोन बळी
रखडलेले काम पूर्ण करा
शहरातील रिंगरोडचे संत तोताराम महाराज गाडेगावकर मार्ग असे नामकरण करण्यात आले आहे. मात्र, या मार्गाचे काम गेल्या अनेक वर्षांपासून रखडले आहे. महामार्गावरून वळसा घालून वाहनधारकांना शहरात प्रवेश करावा लागतो. हा त्रास कमी करण्यासाठी रिंगरोडचे काम पूर्ण होणे आवश्यक आहे.
-शिशिर जावळे, अध्यक्ष, साई निर्मल फाउंडेशन

पालिकेचा पाठपुरावा
रिंगरोडचे काम बहुतांशी पूर्ण झाले आहे. काही ठिकाणी पुलाचे काम अपूर्ण आहे. ते पूर्ण झाले की, रस्त्यांची जोडणी होईल. तसेच तांत्रिक अडचणी आल्याने सध्या हे काम रखडले आहे. याबाबत नगरपालिकेचा पाठपुरावा सुरू आहे. लवकरच काम पूर्ण करण्याचा नगरपालिकेचा प्रयत्न आहे.
-अनिल जगताप, मुख्याधिकारी, भुसावळ

गतिरोधकांचाही विसर
जळगावरोड, यावल रोडवर गतिरोधक नसल्याने अपघातांचे प्रमाणही वाढले आहे. याच रस्त्यावर सेंट अलॉयसेस हायस्कूल असल्याने नेहमीच विद्यार्थ्यांची वर्दळ राहते. धुराळ्यामुळे समोरचे वाहनच दिसत नसल्याचे चित्र आहे.

आंदोलनांचा परिणाम शून्य
शिवसेनेने गेल्या महिन्यात याच रस्त्यावरील खड्डय़ांच्या विषयाकडे लक्ष वेधण्यासाठी ‘खड्डे चुकवा, सायकल चालवा’ स्पर्धा घेतली होती. त्यानंतर पालिकेने तात्पुरती मलमपट्टी म्हणून मुरूम टाकला. मात्र, या मुरुमाची आता माती झाल्याने तो त्रास वाढला आहे.