आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भुसावळ शहरानजीक राष्ट्रीय महामार्गाची चाळण; पावसाचा परिणाम

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भुसावळ- शहराच्या अंतर्गत भागातून जाणार्‍या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहाचीही आता चाळण झाली आहे. यापूर्वी केवळ साइडपट्टय़ा नसल्याने अपघातांचे प्रमाण वाढले होते. मात्र साइडपट्टय़ांच्या पाठोपाठ आता रस्त्याच्या माधोमधही मोठय़ा प्रमाणावर खड्डे निर्माण झाल्याने अपघातांच्या प्रमाणात वाढ होणार आहे.

नवोदय विद्यालय ते फेकरी टोलनाक्यादरम्यान तब्बल चार ते पाच किलोमीटर लांबीचा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा शहरातून गेलेला आहे. मुंबई आणि नागपूरकडे जाणार्‍या अवजड वाहनांसह शेजारील तालुक्यांना जोडणारी वाहतूक या मार्गावरुनच होते. महामार्ग चौपदरीकरणाच्या नावाखाली रस्त्याची डागडुजी रखडली आहे. गेल्या महिन्यात रस्त्यांच्या साइडपट्टय़ांचे काम रखडल्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले होते. गेल्या पंधरवड्यापासून शहरात संततधार पाऊस सुरु असल्याचाही महामार्गाला फटका बसला आहे. शहरांतर्गत भागातून गेलेल्या महामार्गावर प्रचंड प्रमाणात खड्डे निर्माण झाले आहेत. त्यातून मार्ग काढताना वाहनधारकांना तारेवरची कसरत करावी लागते. अवजड वाहनांच्या वाहतुकीचे प्रमाण अधिक असल्याने अपघात होण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे. शहरांतील सर्वच रस्त्यांची स्थिती अत्यंत विदारक झाली आहे. यातील काही मार्गांचा वापर टाळून नागरिक राष्ट्रीय महामार्गाचा वापर करीत होते. आता राष्ट्रीय महामार्गाचीही दुर्दशा झाल्याने पर्यायी रस्ताच नसल्याचे वास्तव समोर आले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या महामार्ग शाखेकडून प्राधिकरणाकडे रस्ता हस्तांतरित करण्यात आला. यानंतर रस्त्याच्या डागडुजीसाठी निधीही मिळाला होता. मात्र प्राधिकरणाने थेट चौपदरीकरणाची तयारी सुरु केली आहे. या मुळे महामार्गाचे चौपदरीकरण होत नाही तोपर्यंत नागरिकांना अशाच खड्डेमय रस्त्यातून प्रवास करावा लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दक्षिणेकडील भागांत नागरिकांचा दररोज महामार्गाशी संबंध येतो. दैनंदिन कामकाजानिमित्त या भागातील नागरिकांना महामार्गावरुन जावेच लागते. महामार्गावरील खड्डय़ांमुळे वाहन चालवणे घातक झाले आहे. महामार्ग विभागाने चौपदरीकरणापूर्वी डागडुजी करणे गरजेचे आहे. महामार्गाला जोडणार्‍या रस्त्यांकडेही लक्ष दिले पाहिजे.
-कादीर शहा, रहिवासी, मुस्लिम कॉलनी, खडकारोड, भुसावळ

खडका चौफुली खिळखिळी
महामार्गावरील खडका चौफुली परिसरात संततधार पावसामुळे मोठय़ा प्रमाणात खड्डे पडले असून रस्ता ओलांडणेही जिकरीचे ठरत आहे. साइडपट्टय़ा वाहून गेल्याने रविवारी काही व्यावसायिकांनी साइडपट्टय़ांमध्ये स्वखर्चाने मुरुम टाकून दुरुस्ती करुन घेतली. खडका चौफुलीजवळील गतिरोधकही पावसामुळे नष्ट झाल्याने गतिरोधक तयार करण्याची मागणी समोर आली आहे. मात्र, त्याकडे दुर्लक्ष झाल्याने संताप व्यक्त होत आहे.