आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गणरायामुळे उजळणार जळगावातील रस्त्यांवरील खड्डय़ांचे भाग्य

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- यंदा जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासूनच सुरू झालेल्या जोरदार पावसामुळे शहरातील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. सर्वच प्रमुख रस्त्यांवर प्रचंड खड्डे पडले असले तरी शहरात रस्त्यांची मोठी कामे करणे सद्य:स्थितीत शक्य नाही. मात्र, गणेशोत्सव काळात खड्डे बुजविण्याचे काम प्रशासनाने हाती घेतले आहे.

शहर परिसरात यंदा जोरदार पाऊस झाल्याने रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. तात्पुरती उपाययोजना म्हणून पावसाळ्यात काही ठिकाणचे खड्डे बुजविण्यासाठी मुरूम टाकण्यात आला होता. पावसाळा संपताच मुरुमाची माती होऊन सर्वच रस्त्यांवर धुळीमुळे वाहनधारक त्रस्त झाले आहेत. पाऊस थांबल्यावर प्रशासनातर्फे प्रमुख रस्त्यांवरील खड्डय़ांचे सर्वेक्षण करण्यात आले होते. पावसाने चांगली उघडीप घेतल्याने आता पॉटहोल मशीनच्या सहायाने सर्वच प्रमुख वर्दळीच्या रस्त्यांची डागडुजी करण्यात येणार आहे.

विसर्जन मार्गाचे काम सुरू
जिल्हा परिषद ते अजिंठा चौफुली, भिलपुरा चौक ते कोर्ट चौक, कोर्ट चौक ते आकाशवाणी, कोर्ट चौक ते गणेश कॉलनी यासह इतरही प्रमुख वर्दळीच्या रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यात येणार आहेत. बुधवारी अनंतचतुर्दशी असल्याने प्राधान्याने गणेश विसर्जन मार्गाचे काम सध्या प्रगतीपथावर सुरू आहे. टप्प्याटप्प्याने शहरातील इतर रस्त्यांच्या डागडुजीचे काम हाती घेण्यात येणार आहे.