जळगाव- रेल्वे स्टेशन ते 'जिल्हा' परिषदे दरम्यानचा रस्ता रुंदीकरणासाठी श्रीमती आनंदीबाई देशमुख बालक मंदिराची भिंत पाडण्यात आली आहे. तसेच भिंतीसोबत शाळेच्या प्रांगणात असलेली घसरगुंडी व मैदानी क्रीडाप्रकाराचे लोखंडी साहित्यही काढले आहे. अतिक्रमण विभागाच्या पथकाने मंगळवारी कारवाई केली.
रस्ता रुंदीकरणासाठी ५४ वर्षे जुन्या असलेल्या आनंदीबाई देशमुख बालक मंदिराची भिंत पाडण्याचा ठराव महासभेत केला होता. याप्रकरणी ३१ जुलै रोजी पूर्व खान्देश बालशिक्षण संस्थेच्या संचालकांना नोटीसही दिली होती. या ठरावाची अंमलबजावणी करत पालिकेच्या अतिक्रमण विभागाने मंगळवारी शाळेच्या समोरची संरक्षण भिंत पाडली. भिंतीपासून पाच मीटर (१७ फूट) जागा पालिकेने संपादित केली आहे. त्यामुळे शाळेच्या पर्यावरणापसून केवळ अडीच ते तीन मीटर जागा शिल्लक राहणार आहे. तसेच या भिंतीलगत असलेली पाण्याची टाकी तोडण्यापूर्वी नवीन टाकी बांधकाम करण्यासाठी शाळेला दोन आठवड्यांची मुदत दिली.