आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चार तासांत रस्ते खड्ड्यात, पावसाने वाढवला खड्ड्यांचा ताप

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धुळे - शहराचा स्मार्ट सिटीत समावेशासाठी गाजावाजा होत आहे. मात्र, चार तासांच्या पावसाने महापालिकेची निकृष्ट कामे उघड केली. पावसामुळे रस्त्यांची पुरती चाळण झाली आहे. लहान खड्डे माेठे झाल्यामुळे वाहनचालकांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. गेल्या महिन्यातच हे खड्डे बुजवण्यासाठी जवळपास तीन ते चार लाखांचा खर्च करण्यात आला होता. मात्र, खड्डे पूर्णपणे बुजवले गेले नाही. खड्ड्यांसाठी करण्यात आलेला खर्च वाया गेल्याचे पावसामुळे उघड झाले आहे.

शहरात काल शुक्रवारी मध्यरात्रीनंतर पावसाने हजेरी लावली. पहाटे चार वाजेपासून सकाळी आठ वाजेपर्यंत जवळपास चार तास संततधार पाऊस सुरू होता. महिनाभराच्या प्रतीक्षेनंतर हा पाऊस झाला. सकाळी १० वाजेपर्यंत कमी-अधिक प्रमाणावर पावसाची रिपरिप सुरू होती. या पावसाने शहरातील सर्व रस्त्यांवरील खडी, डांबर उखडून निघाले. निकृष्ट दर्जाची कामे यामुळे उघड झाली. प्रथमच बऱ्यापैकी काेसळलेल्या पावसामुळे सर्वत्र पाण्याचे लहान तळे साचले. रस्त्यांवरही खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याचे दिसून आले. तसेच रस्त्यावरील खड्ड्यांचा आकार पावसामुळे वाढला.

प्रामुख्याने संतोषीमाता चौक, पोलिस अधीक्षक कार्यालय, जिल्हा न्यायालयाचा मार्ग, दसेरा मैदानासमाेरील रस्ता, बारापत्थर, श्रीराम पेट्रोल पंप, पारोळा रोडवरील बाजार समिती, ८० फुटी रोड, पंचवटी ते एसएसव्हीपीएस, महावदि्यालय आणि इतर भागातील रस्त्यांवरील खड्ड्यांमधील खडी पावसामुळे निघाली. खड्ड्यांचा आकार वाढला. त्यात पाणीही साचले. पाण्यामुळे खड्ड्यांचा अंदाज आल्याने अनेक दुचाकीचालक खड्ड्यांत जाऊन आदळले. काहींना किरकोळ प्रमाणात दुखापतही झाली. काही ठिकाणी पाच ते सहा महिन्यांपूर्वी रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले असताना त्या रस्त्यावर खड्डे पडल्याने तेथील रस्त्याचा निकृष्टपणा जणू पावसाने उघड केला.

१. मालेगाव रोडवर पहिल्याच किरकोळ पावसात रस्त्याची उडालेली दैना.
२. शहरातील बीएसएनएल कार्यालयासमोरील रस्ताही पावसामुळे ठिकठिकाणी उखडला गेला.
३. दसेरा मैदान परिसरातही रस्त्यावर अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत.

शहरातील चारचाकी वाहनांसह बसेसकडून वापर होणारा मुख्य रस्ता म्हणजे महात्मा फुले पुतळा ते रेल्वेस्थानकापर्यंत अर्धा किलोमीटर अंतरावर अनेक खड्डे पडले आहेत. पूर्वी या रस्त्याचे सिमेंट काँक्रिटीकरण करण्यात आले होते. तसेच आजूबाजूच्या रस्त्याचे डांबरीकरण केले गेले आहे. त्यामुळे अर्धा रस्ता सिमेंट आणि अर्धा डांबराचा अशी परिस्थिती आहे. चार ते पाच ठिकाणी दोन फुटांपर्यंत खड्डे झाले आहेत. त्यामुळे या मार्गाने जाणाऱ्या बसेसना अपघात होण्याचा धोका वाढला आहे.

दर्जेदार कामाबाबत दुर्लक्ष
महापालिकेकडूनपावसाळ्यापूर्वी काही लाख रुपये खर्च करून प्रमुख रस्त्यांवरील खड्डे बुजवण्याचे काम करण्यात आले. मात्र, वरवर हे काम करण्यात आल्याचे पावसाने स्पष्ट झाले. खड्डे बुजवण्याचे काम दर्जेदार करण्याबाबत महापालिका अधिकाऱ्यांकडून दुर्लक्ष करण्यात आले आहे. दर्जेदार कामाकडे लक्ष दिले असते तर थाेड्याशा पावसाने रस्त्यावरील खड्ड्यांच्या आकारात वाढ झाली नसती.

स्मार्टसिटीसाठी ठरू शकतो अडथळा
एकीकडेपंतप्रधानांच्या स्मार्ट सिटी योजनेत शहराच्या समावेशासाठी प्रयत्न होत असताना शहरातील रस्त्यावर वारंवार पडणाऱ्या खड्ड्यांची समस्या भविष्यात स्मार्ट सिटी योजनेसाठी धोकादायक ठरू शकते. त्यामुळे आतापासून त्याबाबत ठोस उपाययोजना करून दर्जेदार रस्ते होण्याबाबत लोकप्रतिनिधी, अधिकाऱ्यांनी लक्ष देणे गरजेचे आहे.

स्टेशनरोडवर चार मोठे खड्डे
रेल्वेस्थानकते दसेरा मैदानापर्यंतच्या रस्त्याचे काम गेल्या वर्षीच झाले होते. या रस्त्याचे डांबरीकरण झाल्याने नागरिकांची चांगली सोय झाली होती. मात्र, वर्षापूर्वी झालेल्या या रस्त्यावर दसेरा मैदानाकडून स्थानकाकडे येणाऱ्या रस्त्याच्या सुरुवातीला चार मोठे खड्डे तयार झाले आहेत. त्या ठिकाणी काही दुचाकीधारकांना अपघात झाल्याचे आजूबाजूच्या नागरिकांचे म्हणणे आहे.