आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आधी रस्ते नव्हते म्हणून, आता रस्ते करूनही शिव्या

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - टॉवरचौक ते चित्रा चौकादरम्यानचा रस्ता दुरुस्तीचे काम हाती घेऊन १५ दिवस उलटले. परंतु, अद्यापही हे काम पूर्ण होऊ शकलेले नाही. रस्त्यावर दगड-गोटे बाहेर आलेले असल्याने वाहनधारकांना खूप अडचणींचा सामना करावा लागत आहे. आधी शहरात रस्ते होत नाहीत म्हणून नागरिकांच्या शिव्या खाव्या लागत हाेत्या, आता रस्ते करूनही शिव्या मिळत असल्याची व्यथा खाविआचे नेते नितीन लढ्ढा यांनी स्थायीच्या सभेत व्यक्त केली.
महापालिकेच्या सभागृहात शुक्रवारी सकाळी ११ वाजता स्थायी समितीची सभा झाली. सभेत ‘दिव्य मराठी’ ने फेब्रुवारी रोजी दिव्य सिटीवरील रिडर्स स्पेस’मधील कॉलममध्ये टॉवर ते चित्रा चौकादरम्यानच्या रस्त्याची स्थिती फोटोसह मांडली होती. त्याची दखल घेऊन खाविआचे नेते लढ्ढा यांनी सभेत रस्त्याचे कारपेट केले जात नसल्याने वाहन पंक्चर होणे, वाहन चालवताना होणारा त्रास याविषयी प्रश्न उपस्थित केला होता. दोन दिवसांच्या कामाला १५ दिवस लागत असल्याने नाराजीही व्यक्त केली.

सभेच्या अध्यक्षस्थानी सभापती ज्योती चव्हाण होत्या. भाजप सदस्य सुनील माळी यांनी शिक्षण मंडळाच्या कर्मचा-यांना महिन्यांपासून वेतन नसल्याचा मुद्दा उपस्थित करून पालिका निधीतून वेतन देण्याची सूचना केली. परंतु, पालिकेची आर्थिक स्थिती नसल्याने महासभेत ठराव करून केवळ शासनाच्या निधीतून वेतन दिले जात असल्याचे आयुक्त संजय कापडणीस यांनी स्पष्ट केले. बदल करायचाच असेल, तर महासभेत विषय आणावा लागेल अशी सूचनाही केली. खाविआचे गणेश सोनवणे यांनी फुले मार्केटमध्ये वाहन पार्किंगच्या जागेवर अतिक्रमण आहे, त्यामुळे वाहनधारकांनी रस्त्यावर वाहने लावली तर त्यांना दंड सोसावा लागतो, अशी तक्रार केली. दरम्यान, आयुक्तांनी अतिक्रमण काढून टाकण्याच्या सूचना केल्या.

०९ महिन्यांपासून शिक्षण मंडळाच्या कर्मचा-यांना वेतन नसल्याचा मुद्दाही केला उपस्थित
०२ दिवसांच्या कामाला १५ दिवस लागत असल्याने व्यक्त केली नाराजी.
०४ फेब्रुवारी रोजी दिव्य सिटीवरील ‘रिडर्स स्पेस’कॉलममध्ये मांडली होती रस्त्याची स्थिती

मीटर रस्त्यावर अडीच मीटर अतिक्रमण
मनसेचेसंतोष पाटील यांनी त्यांच्या प्रभागात मीटर रस्त्यावर अडीच मीटर अतिक्रमण झाल्याचे सांगितले. अतिक्रमण काढण्याचे आदेश निघूनही संंबंधितांना पालिकेचे अधिकारी घाबरतात, असा आरोप केला. अतिक्रमण दिसत असतानाही कारवाई होत नसल्याचे सांगितले. कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले. झोपडपट्टीधारकांना नळ कनेक्शन देण्याचा विषय अनिल देशमुख यांनी उपस्थित केला. पुरावे देण्यावरून अमर जैन यांनी अतिक्रमितांना नळ कनेक्शन कशाच्या आधारे दिले? असा प्रश्न उपस्थित केला.

लाकडांचा प्रश्न अंतिम टप्प्यात
पालिकेने आर्थिक परिस्थितीअभावी स्मशानभूमीत पुरवण्यात येणारे मोफत लाकूड देणे बंद केले होते. त्यावर सर्वपक्षीय ठराव करून उपविधी मंजुरीसाठी शासनाकडे रवाना केली आहे. यावर निर्णय घेण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याचे आयुक्तांनी सभागृहात सांगितले.