आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रस्ता सुरक्षा पंधरवड्याचा बट्टय़ाबोळ

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भुसावळ - शहरातील रस्त्यांची स्थिती विदारक आहे, त्यातच अरूंद रस्त्यांवरून क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी घेऊन जाणार्‍या वाहनांची समस्येत भर पडली आहे. शहरातून जामनेर, बोदवड, वरणगाव, मुक्ताईनगर, सावदा, फैजपूर, यावल आणि जळगाव या शहरांना जोडण्यासाठी अँपेरिक्षा, मिनीडोअर, टाटा मॅजिक ही प्रवासी वाहने चालतात. मात्र, रस्ता सुरक्षा पंधरवड्यातही या वाहनांद्वारे क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी वाहून नेले जात आहेत.
खासगी अर्थात परवाना नसलेल्या वाहनांची संख्याही अधिक आहे. केवळ जळगाव मार्गावर 250 खासगी टाटा मॅजिक वाहने चालतात. यासह राष्ट्रीय महामार्गावरून अँपेरिक्षासारख्या छोट्या वाहनांना वाहन चालवण्याची परवानगी नसताना जळगाव, वरणगाव, बोदवड येथे सुमारे 400 अँपेरिक्षा प्रवाशी वाहतूक करत असल्याचे विदारक चित्र आहे.
जळगाव रोडवर केवळ 70 टाटा मॅजिक रिक्षांना रितसर परवानगी आहे. अर्थात त्यातूनही अधिक क्षमतेने प्रवासी वाहतूक होतेच. अर्थात यासाठी शहर वाहतूक शाखा, बाजारपेठ पोलिस ठाणे, जळगाव जिल्हापेठ पोलिस ठाणे, नशिराबाद पोलिस, एमआयडीसी पोलिस आणि महामार्ग विभागाच्या पोलिसांना ‘दक्षिणा’ द्यावी लागते. एकंदरीत रस्ता सुरक्षा पंधरवड्यातही प्रवाशांच्या जिवाशी खेळ सुरूच आहे.
शाळांमध्ये प्रबोधन करणार
रस्ता सुरक्षा पंधरवड्यात विनापरवानाधारक वाहनांवरही कारवाई केली जाणार आहे. शहरातील शाळांमध्ये प्रबोधन करून अल्पवयीन विद्यार्थ्यांनी वाहने चालवू नये, यासाठी प्रयत्न करू. या पंधरवड्यात वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी वाहतूक शाखेतर्फे वेळोवेळी सचोटीने प्रयत्न केले जात आहेत. सतीश जाधव, सहायक पोलिस निरीक्षक, शहर वाहतूक शाखा, भुसावळ
उपोषणाची तयारी
परवानाधारक प्रवासी वाहनधारक वर्षाकाठी कराच्या रुपाने 25 हजारांची रक्कम शासनाकडे जमा करतो. विनापरवाना वाहनांच्या माध्यमातून मात्र, असा कोणताही कर शासनाला मिळत नाही. हा प्रकार बंद न झाल्यास उपोषण करणार आहोत. संजय पाटील, जिल्हाध्यक्ष, परवानाधारक चालक-मालक संघटना
विद्यार्थी सुसाट
शहरातील बहुतांश अल्पवयीन विद्यार्थी थेट स्कूटर आणि मोटारसायकल घेऊन सुसाट वेगाने शाळेत येतात. परवाना नसताना खड्डेमय रस्त्यांवर चालणार्‍या पादचार्‍यांनाही धोका निर्माण झाला आहे. रस्ता वाहतूक सुरक्षा पंधरवड्यातही असे प्रकार घडत असल्याने शहर वाहतूक शाखेच्या कार्यक्षमतेविषयी प्रश्‍नचिन्ह निर्माण होत आहे.
संघटनेने दिले निवेदन
रस्ता सुरक्षा पंधरवडा सप्ताह सुरू असतानाच शहर पोलिसांना जळगाव जिल्हा परवानाधारक टाटा मॅजिक चालक-मालक संघटनेने निवेदन दिले आहे. खासगी अँपेरिक्षा बंद कराव्यात. तसेच खासगी वाहनांवर कोणत्याही प्रशासकीय यंत्रणेचा वचक राहिला नसल्याचा आरोप संघटनेने दिलेल्या निवेदनात केला आहे. निवेदनावर जिल्हाध्यक्ष संजय पाटील, उपाध्यक्ष धनराज सोनवणे, कार्याध्यक्ष लक्ष्मण चौधरी आदींच्या स्वाक्षर्‍या आहेत.
बसस्थानकाला गराडा
शहर वाहतूक शाखेतर्फे रस्ता सुरक्षा पंधरवड्यानिमित्त चालकांना मार्गदर्शन करून विविध उपक्रम राबवले जात आहेत. मात्र अवैध प्रवासी वाहतूकदारांना अजूनही शिस्त लागली नाही. बसस्थानकाला प्रवासी वाहनांचा गराडा कायम आहे. प्रवाशांची पळवापळव आणि थेट शहर वाहतूक शाखेच्या पोलिसांदेखत फंट्र सिट प्रवासी बसवून नेणार्‍या वाहनधारकांवरही कारवाई होत नसल्याची स्थिती आहे.