आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

एलईडी सिग्नल यंत्रणा दिवास्वप्न; शहरात 10 वर्षांपासून पाच चौकांतील सिग्नल बंद

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शहरातील वाहतूक सुरळीत व्हावी, म्हणून पालिका प्रशासनाने सन 2003-04 मध्ये अतिवर्दळीच्या पाच ठिकाणी सिग्नल यंत्रणा कार्यान्वित केली होती. एखाद दोन वर्ष सिग्नल यंत्रणा कार्यान्वित राहिली. यानंतर मात्र सर्वच सिग्नल बंद झाले. यामुळे वाहतूक शाखेच्या पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे. पालिका प्रशासनाने सौरऊर्जेवरील ‘एलईडी’ यंत्रणा कार्यान्वित करण्यासाठी हालचाली केल्या होत्या. मात्र, याबाबतचा प्रस्तावही तयार झाला नसल्याने ही यंत्रणा उभे राहणे सध्या तरी शहरवासीयांसाठी दिवास्वप्नच आहे.

भुसावळ - शहरात सन 2003-04 मध्ये सिग्नल यंत्रणा कार्यान्वित झाली. अरुंद रस्ते, वाहतुकीची कोंडी, बेशिस्त वाहनधारकांना शिस्त लावून अपघातांचे प्रमाण टाळण्यासाठी ही यंत्रणा अत्यंत उपयोगी ठरणार होती. प्रारंभी एक ते दीड वर्ष सर्व सिग्नल सुरू होते.
नागरिकांसह पादचार्‍यांना या सिग्नल यंत्रणेमुळे दिलासा मिळाला होता, परंतु तो कायम राहिला नाही. शहराची लोकसंख्या 1 लाख 87 हजार असून तब्बल 75 हजार वाहने भुसावळ शहर आणि तालुक्यातील नित्याने भुसावळ शहराशी संपर्क येणाºया गावांमध्ये आहेत. शहरातून महामार्ग क्रमांक सहा गेल्याने सिग्नल यंत्रणेची अत्यावश्यक गरज आहे. शहरातील मध्यवर्ती भागात बसस्थानक आणि रेल्वेस्थानक असल्याने दररोज एसटी बसेस आणि खासगी वाहनांची वर्दळ असते. यामुळे नाहाटा चौफुली, पांडुरंग टॉकीज चौक आणि बाजारपेठ पोलिस ठाण्याजवळ सिग्नल यंत्रणेची आवश्यकता आहे. दुर्दैवाने एकही सिग्नल सुरू नसल्याने पालिकेची लाखो रुपयांची मालमत्ता धूळ खात पडून आहे. सिग्नल यंत्रणा शो-पीस ठरत आहे.

तुटलेले सिग्नल पालिकेने केले जमा
रस्ता दुरुस्ती, सौंदर्यीकरण अशी कोणतेही कामे झाली नसतानाही सिग्नलची मोडतोड झाली. बहुतांश ठिकाणी तुटलेले सिग्नल पालिकेने जमा करून भंगारात ठेवले आहेत. सिग्नल यंत्रणेची केबल संपूर्णपणे खराब झाली आहे. लाल, पिवळे आणि हिरवे दिवे फ्यूज झाले आहेत. टायमिंग यंत्रणेतही बिघाड झाल्याने सिग्नल यंत्रणा जवळपास 10 वर्षांपासून बंद आहे.
नाहाटा चौफुलीवर पाच वर्षांत झाले 58 अपघात
नाहाटा चौफुली भागात सर्वाधिक अपघात झाले आहेत. गेल्या पाच वर्षांच्या कार्यकाळात 58 जीवघेणे अपघात झाले होते. याबाबत तत्कालीन पोलिस निरीक्षक नजीर शेख यांनी पालिकेला पत्रव्यवहार करून अपघात थांबवण्यासाठी सिग्नल यंत्रणेचीही मागणी केली होती. वाहतूक शाखेचे शहर कार्यालय नाहाटा चौफुलीजवळ हलवल्यानंतर अपघातांवर नियंत्रण आले आहे. महामार्गाच्या दक्षिणेकडील भागात मंदिर, शाळा, महाविद्यालय तर उत्तरेकडील भागात बाजारपेठ, भाजीबाजार, प्रमुख शासकीय कार्यालये असल्याने महामार्ग ओलांडून प्रवास करणार्‍यांची संख्या अधिक आहे.

शहरात येथे उभारली आहे सिग्नल यंत्रणा
शहरातील बाजारपेठ पोलिस ठाणे परिसर, राष्ट्रीय महामार्गावरील नाहाटा महाविद्यालय चौफुली, मुख्य भागातील पांडुरंग टॉकीज चौक, सतारे भागातील सरदार वल्लभभाई पुतळा परिसर आणि यावल रोडवरील गांधी पुतळ्याजवळ अशा पाच ठिकाणी सध्या सिग्नल यंत्रणा आहे. मात्र, ती कार्यान्वित होण्याची प्रतीक्षा आहे.

वाहतूकचे पॉइंट, नियुक्त कर्मचारी
बसस्थानक चौक 2
हंबर्डीकर चौक 3
गांधी पुतळा 2
गजानन महाराज मंदिर 2
बाजारपेठ पोलिस ठाणे 1
खडका चौफुली 1
डॉ. आंबेडकर पुतळा 1
नाहाटा चौफुली 3
पेट्रोलिंग 5
इतर बंदोबस्त 2
अत्यावश्यक बंदोबस्त 2
अरूंद रस्त्यांवर वाहन पार्किंग करणे टाळले पाहिजे
४सिग्नल यंत्रणा कार्यान्वित झाल्यास वाहतूक सुरळीत होण्यास मदत होईल. याबाबत पालिकेला अनेकवेळा पत्रव्यवहार झाला आहे. वाहतूक सुरळीत ठेवण्याची जबाबदारी आमची असली तरी नागरिकांच्या सहभागाशिवाय शिस्त लावणे कठीण आहे. शहरात अरूंद रस्त्यांवर पार्किंग करणे टाळले पाहिजे. मार्गावर वाहन वळवताना आजूबाजूच्या वाहनांचा अंदाज घ्यावा.

सतीश जाधव, सहायक निरीक्षक, वाहतूक शाखा
४शहरात अत्याधुनिक सिग्नल यंत्रणेसाठी प्रयत्न केले. सध्या असलेल्या सिग्नल यंत्रणेचा मेंटनन्सचा खर्च अधिक असल्याने सौरऊर्जेवरील तसेच एलईडी दिवे असलेले सिग्नल बसवण्याचा मानस होता. मात्र, पालिकेतील प्रभारीराज संपत नाही तसेच अनेक प्रस्ताव केवळ विद्युत विभागात कर्मचारी नसल्याने रखडले आहेत. सिग्नल यंत्रणा सुरू व्हावी, यासाठी पालिकेचे पाठपुराव्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
- उमेश नेमाडे, नगराध्यक्ष, भुसावळ