आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नावात बदल करून पाच वर्षांत रस्त्याची दोनवेळा दुरूस्ती

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

यावल - शहरातील महाजन गल्लीतील एका रस्त्याच्या नावात बदल करून पुन्हा त्याच रस्त्याच्या कॉंक्रिटीकरणाचे काम यावल पालिकेमार्फत ठेकेदाराने सुरू केले आहे. या रस्त्यावर तीन वर्षांपूर्वी खासदार निधीतून 15 लाख रुपये तर आता रस्ता निधीतून 26 लाख रुपये खर्च होत आहेत. आता निकृष्ट काम झालेल्या रस्याचे जेसीबीच्या सहायाने खोदकाम सुरू आहे.
तत्कालिन नगराध्यक्षा वंदना बारी यांच्या कार्यकाळात पाच वर्षांपूर्वी महाजन गल्लीतील रस्ता म्हसोबा मंदिरापासून तर एच.एस.खान बॅन्ड दुकानापर्यंत यावलमधील ठेकेदाराने केला होता. त्यावेळी खासदार निधीतून रस्त्याच्या कामासाठी 15 लाख रुपये निधी उपलब्ध झाला होता. आता पुन्हा या रस्त्याच्या नावात बदल करण्यात आला आहे. काटकर यांच्या पानटपरीपासून ते खिर्नीपुरा चौक असे नाव देवून कॉंक्रिटीकरणाचे काम यावल पालिकेने रस्ता विकास निधीतून हाती घेतले आहे. यासाठी 26 लाख रुपये खर्च येणार आहे.
पाच वर्षांपूर्वी काम अतिशय निकृष्ट झाल्याने अल्पावधितच रस्त्याचे बारा वाजले. जागोजागी खड्डे पडून रहदारीस अडथळा निर्माण झाला. यामुळे वाहनचालक, नागरिकांना मोठा त्रास झाला. रस्त्याविषयी ओरड व्हायला सुरुवात झाल्याने पालिकेने पुन्हा रस्ता कॉंक्रिटीकरणाचे काम हाती घेतले आहे. दरम्यान, पाच वर्षांपूर्वी केलेल्या 15 लाख रुपये खर्चाचे काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे. रस्त्याच्या कामानंतर ठरवून दिलेल्या मुदतीपर्यंत त्याच्या देखभाल-दुरूस्तीची जबाबदारी संबंधित ठेकेदाराकडे असते. यावलमध्ये मात्र हा प्रकार दिसत नाही.
जेसीबीने खोदाई - महाजन गल्लीतील सिमेंट कॉंक्रिटचा रस्ता जेसीपीच्या सहायाने खोदण्यात येत आहे. त्यात पाच वर्षांपूर्वी झालेल्या कामाची गुणवत्ता कशी होती, हे समोर येत आहे. त्यामुळे आता 26 लाख रुपये खर्च करून चांगला रस्ता व्हावा, अशी नागरिकांची अपेक्षा आहे. तसेच यापूर्वी झालेल्या निकृष्ट कामाची चौकशी करून ठेकेदारावर कारवाईची गरज आहे.