आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भुसावळात अफवांचा बाजार तेजीत; दुकाने पुन्हा बंद

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भुसावळ- रविवारच्या दंगलीनंतर अशांततेच्या गर्तेत असलेल्या भुसावळात गुरुवारी बाजारपेठेतील व्यवहार नेहमीप्रमाणे सुरू होते. मात्र, दुपारी पुन्हा पटापट दुकाने बंद झाली. व्यावसायिकांसह पोलिसांची धावपळ उडाली. चौकशीअंती हा प्रकार केवळ अफवेतून झाल्याचे समोर आले. त्यामुळे पोलिसांनी आता अफवा पसरवणार्‍यांवर लक्ष केंद्रीत केले आहे.

सिंधी व्यापारी आणि वाल्मीकनगरमधील युवकांमध्ये मोबाइल रिचार्ज करण्यावरून रविवारी वाद झाले होते. यामुळे मार्केटमध्ये मंगळवारपर्यंत तणाव कायम होता. पोलिसांनी खबदारी म्हणून वाल्मीकनगर, डिस्को टॉवर परिसरात बंदोबस्त वाढवला आहे. मात्र, बंदोबस्त कायम असला तरी अफवांचा बाजार तेजीत आहे. बुधवारप्रमाणेच गुरुवारी दुपारी बाजारपेठेत गोंधळ झाल्याची अफवा उठली. जखमी युवकाचा मृत्यू झाल्याची वार्ता पसरताच अनेक व्यापारी दुकाने बंद करून रस्त्यावर आले. गर्दी जमल्याचे पाहून पोलिस सतर्क झाले. बाजारपेठचे पोलिस निरीक्षक प्रभाकर रायते यांनी शांततेचे आवाहन करत अफवा पसरवणार्‍यांवर कारवाई करण्याची भूमिका घेतली. यानंतर काही व्यापार्‍यांनी व्यवहार पूर्ववत सुरू केले.

युवकाला ताब्यात घेतले
गुरुवारी मार्केटमध्ये अप्रिय घटना घडली, अशी अफवा पसरविल्याच्या संशयावरून बाजारपेठ पोलिसांनी गोपाळ चहावाला नावाच्या एका युवकाला ताब्यात घेतले आहे. व्यापारी-दुकानदारांनी अफवा पसरवणार्‍यांबद्दल पोलिसांना माहिती द्यावी. प्रभाकर रायते, पोलिस निरीक्षक, बाजारपेठ ठाणे