आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बसस्थानकाच्या शौचालयातून दागिन्यांची बॅग चोरीस; सहा तासांमध्ये चोरटा जेरबंद

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- मानवत (जि.परभणी) येथील सराफ व्यापारी मंगळवारी सायंकाळी वाजता नवीन बसस्थानकातील शाैचालयाच्या बाहेर सव्वा तीन लाखांचे सोन्याचे दागिने ठेवलेली बॅग ठेऊन शाैचास गेला हाेता. ही संधी हेरून भामट्याने दागिन्यांची बॅग लंपास केली. हा प्रकार व्यापाऱ्याला कळाल्यानंतर त्याने बॅगचा शाेध घेतला परंतु बॅग सापडल्याने जिल्हापेठ पाेलिस स्टेशन गाठले. त्या ठिकाणी सर्व हकिगत सागितल्यानंतर पाेलिसांनी अवघ्या सहा तासांत भामट्याला जेरबंद केले.शौचालयाची साफसफाई करणारा मजूर हा चोरटा असल्याचे निष्पन्न झाले. दरम्यान, हलगर्जीपणा करणाऱ्या व्यापाऱ्याची चांगलीच कानउघाडणी केली. 


मानवत येथील सराफा व्यापारी कपील सुधाकर उदावंत हे मंगळवारी जळगावातील सराफ बाजारातील नवलखा ज्वेलर्स येथे दागिने खरेदीसाठी आले होते. त्यांनी नवलखा ज्वेलर्समधून नेकलेस, कानातले टॉप्स, पेंडल, आयरिंग असे १०७ ग्रॅम वजनाचे लाख २२ हजार ५०० रुपयांचे दगिने खरेदी केले. दागिने घेऊन ते रात्री परतीचा प्रवास करणार होते. यासाठी ते सायंकाळी वाजता नवीन बसस्थानकात अाले. या वेळी त्यांना शौचास लागल्याने त्यांनी शौचालय गाठले. तेथे त्यांनी सोन्याचे दागिने ठेवलेली बॅग शौचालयातील कर्मचारी जितेंद्र अरुण चांगरे याच्या केबिनजवळील खुर्चीजवळ ठेवली. त्यानंतर ते कर्मचाऱ्याच्या हातात पाच रुपये टेकवत शौचालयात गेले. उदावंत बाहेर अाले त्या वेळी त्यांना बॅग गायब झाल्याचे दिसल्याने धक्का बसला. त्यांनी परिसरात बॅगेचा शाेध घेतला पण ती सापडली नाही. त्यामुळे त्यांनी जिल्हापेठ पोलिस ठाणे गाठून पोलिस निरीक्षक सुनील गायकवाड यांना हकिकत सांगितली. गायकवाड यांनी पोलिस उपनिरीक्षक गजानन राठोड, भास्कर पाटील, रवींद्र तायडे, मधुकर पाटील, तुषार जावरे, रवींद्र नरवाडे, राजेश मेंढे, अल्ताफ पठाण, महेंद्र बागुल, ललित पाटील, जगन सोनवणे, रवि वंजारी, नाना तायडे, शेखर जोशी यांचे पथक तयार करून चाेरट्याच्या शाेधार्थ पाठवले. तपासानंतर सहा तासात चाेरट्याला जेरबंद करण्यात अाले. 


पाेलिसांनी जप्त केलेले साेन्याचे दागिने 
पोलिसांनी रात्री १.३० वाजता हरिविठ्ठलनगर गाठून तडवीला ताब्यात घेतले. त्याने गुन्ह्याची कबुली दिली. या प्रकरणी चांगरे, इम्रान सय्यद आणि देवेंद्र गोपाल सनकत या तिघांना साक्षीदार करण्यात आले आहे. मजूर तडवी याने बॅग चोरून आणली होती, हे माहिती नसल्याचे चांगरे याने पोलिसांना सांगितल्याने त्याला या घटनेचा साक्षीदार केल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले. 


दरम्यान, विजय तडवी याला बुधवारी न्यायालयात हजर केल्यानंतर त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. दरम्यान,बॅग सापडल्यानंतर पोलिसांनी हलगर्जीपणा आणि बेजबाबदार वागणुकीबद्दल व्यापाऱ्याची जोरदार कानउघाडणी केली. तर यापुढे काळजी घेण्याचा सल्ला देखील दिला. 


पोलिस पथकाने सुरुवातीला बसस्थानकावर तपास केला. तेथील काही सीसीटीव्ही फुटेज तपासले. रात्री शौचालयाचा कर्मचारी जितेंद्र चांगरे हा निघून गेला होता. त्यामुळे पोलिसांनी रात्री उशिरा जितेंद्रला त्याच्या घरी जाऊन ताब्यात घेतले. त्याला पोलिसी खाक्या दाखवल्यानंतर चांगरे याने आपल्या घरातून उदावंत यांची बॅग काढून दिली, असे पोलिसांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना सांगितले. 


परंतु, या बॅगेत काय आहे? बॅग कोणाची आहे, हे आपणास माहिती नाही. असे चांगरे याने पोलिसांसमोर स्पष्ट केले. ही बॅग विजय जहांगीर तडवी (वय ३८ रा. हरिविठ्ठलनगर) या शौचालयातील मजुराने आपल्याकडे दिली होती, असे चांगरेने जिल्हापेठ पोलिसांना चाैकशीदरम्यान सांगितले. 


परदेशी पर्यटकाचा कॅमेरा चाेरी 
गेल्या १५ दिवसांपूर्वी एक परदेशी कुटंुब अजिंठा लेणीला जाण्यासाठी जळगाव बसस्थानकावर थांबले होते. या कुटंुबातील दोन सदस्य शौचालयात गेले, तर एक जण बसची वेळ पाहण्यासाठी काही सेकंदासाठी साहित्यापासून लांब गेला. या वेळत भामट्याने त्यांचा कॅमेरा लंपास केला हाेता. शौचालयाच्या बाहेरच ही घटना घडली होती. वेळ कमी असल्यामुळे या कुटंुबीयांनी कोणतीही तक्रार देता पुढील प्रवास सुरू केला. जळगाव बसस्थानकात चोख पोलिस बंदोबस्ताचा अभाव असल्याने पर्यटकांना महागडा कॅमेरा गमवावा लागला हाेता. 


लॉकरची साेय नसल्याने अडचण 
नवीनबसस्थानकात प्रवाशांचे साहित्य ठेवण्यासाठी लॉकरची सोय उपलब्ध नाही. त्यामुळे प्रवाशांना शौचालय, एक-दोन तासांच्या कामासाठी बाहेर जाताना साहित्य सोबत घेऊन जावे लागते. प्रत्यक्षात लॉकरची सोय करून देणे हे शासनाचे काम आहे; परंतु पाच लाख लोकसंख्या असलेल्या तसेच पर्यटनासाठी देखील महत्त्वाचा असलेल्या जळगाव बसस्थानकात अशी व्यवस्था नसल्यामुळे प्रवाशांची गैरसाेय हाेत अाहे.

बातम्या आणखी आहेत...