जळगाव - एमआयडीसीतील धान्य मार्केटसमोर राहणार्या एका ८० वर्षीय वृद्ध महिलेला १५ वर्षांच्या मुलाला मारहाण करत चाकूचा धाक दाखवत १२ तोळे सोन्यासह साडेपाच लाखांचा ऐवज लुटून नेण्याची घटना सोमवारी रात्री १०.३० वाजता घडली. दरम्यान, या महिलेचे कुटुंबीय पंधरा दिवसापासून गावी गेले होते. त्यामुळे त्या घरात ऐकट्या होत्या. ही संधी साधून पाळत ठेवत चोरट्यांनी हात साफ केला.
धनराज मेवालाल वर्मा यांचा लाकडाच्या बल्लीचा होलसेल विक्रीचा व्यवसाय आहे. त्यांचे जळगाव-औरंगाबाद महामार्गाला लागूनच पार्टिशनचे छोटेसे घर आहे. घरात त्यांच्यासोबत पत्नी दोन मुले आणि आई जमुनाबाई वर्मा (वय ८०) हे राहतात. ३० वर्षांपासून त्यांचे कुटुंबीय याच जागेवर बल्लींचा व्यवसाय करीत आहेत. धनराज वर्मा हे पत्नी दोन्ही मुलांसह २० एप्रिलपासून इंदूरला नातेवाइकांच्या लग्नासाठी गेले होते. त्यामुळे घरात जमुनाबाई एकट्याच राहत होत्या. मदतीसाठी शेजारीच राहणारा योगेश राजेंद्र चौधरी (वय १५) हा रात्री झोपण्यासाठी वर्मा यांच्या घरी येत होता.
काय घडले सोमवारी रात्री?
जमुनाबाई योगेश हे सोमवारी रात्री झोपलेले होते. रात्री १०.३० वाजता तीन युवकांनी दरवाजा ठोठावला. योगेशने दार उघडल्यानंतर तीन युवकांनी त्यांच्याकडे पाणी मागितले. जमुनाबाई यांनी पाणी बाहेरच असल्याचे सांगत त्यांना टाळले. त्यानंतर १५ मिनिटांनी दरवाजावर जोरदार धक्का मारून तीन युवक थेट घरात घुसले. त्यांनी योगेशच्या गळ्यावर चाकू ठेवला नंतर योगेश जमुनाबाई यांच्या डाेळे, तोड हातावर पट्टी चिकटवली. दोघांना काहीच दिसत नसल्याची खात्री करून त्यांनी पैशांची मागणी केली. योगेशने नकार दिल्यानंतर त्यांनी जमुनाबाई यांच्या पाठीत, पोटात गुद्दे मारले.
त्यामुळे आजीबाईच्या तोंडातून रक्त आले, तर योगेशच्या गळ्याला चाकू लागल्याने तोही जखमी झाला. चोरट्यांनी दोघांना पलंगाच्या कोपर्यात नेऊन चिकटपट्टीने त्यांचे हातपाय बांधले. त्यानंतर एका लोखंडी कपाटाचा दरवाजा तोडला मात्र, त्यात काहीच आढळून आले नाही म्हणून त्यांनी कॉट उघडला. त्याठिकाणी त्यांच्या हाती १२ तोळे सोन्याचे दागिने अडीच लाख रुपये रोख हाती लागले ते दोन मोबाइल असा एकूण सुमारे साडेपाच लाख रुपयांचा ऐवज घेऊन चोरट्यांनी पळ काढला. त्यानंतर योगेशने स्वत:सह जमुनाबाई यांची सुटका केल्यानंतर तो धावतच
आपल्या घरी गेला तेथे आई-वडिलांना सर्व हकिगत सांगितली. योगेशच्या वडिलांनी लागलीच धनराज यांना फोन केला. काही वेळात पोलिसांनाही घटना कळल्याने ते रात्री १२ वाजता पथकासह घटनास्थळी दाखल झाले. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मराठी, हिंदीत संवाद
१५दिवसांपासून आजीबाई एकट्या राहतात, हे पाहून चोरट्यांनी पाळत ठेवून चोरी केली. चोरी करतेवेळी चोरट्यांनी दोघांना धमकावले होते. यातील दोघे चोरटे मराठीत तर एक हिंदीत बोलत होता.
पोलिस अधिकार्यांच्या भेटी
मंगळवारीसकाळी पोलिस उपअधीक्षक किशोर पाडवी यांनी घटनास्थळाला भेट देऊन माहिती घेतली. चोरट्यांच्या तपासासाठी स्थानिक पोलिसांसह धुळे, बुलडाणा येथे माहिती देण्यात आली आहे.
उद्योजकाला पाठवायचे पैसे
वर्माहे १५ दिवसांपासून इंदूर येथे गेले होते. त्यांनी घरात ठेवलेले अडीच लाख रुपये हे कर्नाटकच्या बल्ल्यांची निर्मिती करणार्या उद्योजकांना पाठवायचे होते. पावसाळ्यापूर्वी मोठी खरेदी करण्यासाठी त्यांनी हे पैसे सांभाळून ठेवल्याचे वर्मा यांनी सांगितले.
पोलिसांचा धाक संपला!
वर्मायांचे घर महामार्गाच्या कडेला आहे. एमआयडीसी असल्यामुळे या भागात नेहमी वर्दळ असते. असे असतानाही चोरट्यांनी पोलिसांच्या नाकावर टिच्चून ही चोरी केली. पोलिसांच्या रात्रीच्या गस्ती होत नसल्यामुळे चोरट्यंना फावत आहे. यामुळे पोलिसांचा धाक संपला तर नाही ना? असा प्रश्न उपस्थित होत आहे.