धुळे - शहरातील बडगुजर प्लॉट या वसाहतीत एकट्या राहणार्या वृद्धा सुमनबाई पाटील यांना मारहाण करून दागिने ओरबाडण्यात आले. यानंतर लुटारूने पळ काढला. घटनेनंतर रक्तबंबाळ झालेल्या श्रीमती पाटील यांनी घराबाहेर येऊन मदतीसाठी ओरडण्यास सुरुवात केली. बुधवारी पहाटे घडलेल्या या थरारनाट्यानंतर लुटारूचा शोध सुरू झाला असला तरी उशिरापर्यंत पोलिसांत गुन्हा दाखल झाला नव्हता.
बडगुजर प्लाॅट या वसाहतीत सुमनबाई कौतिकराव पाटील (७४) या राहतात. घरातील काही खोल्या त्यांनी तीन जणांना भाडेतत्त्वावर दिल्या आहेत. त्यापैकी एकाचे नाव गणेश असे आहे. या भाडेकरूची श्रीमती पाटील यांच्याकडे नेहमी ये-जा असते. काल मंगळवारी रात्री नेहमीप्रमाणे श्रीमती पाटील झोपी गेल्या. पहाटे तीन वाजेच्या सुमारास त्यांच्या दारावर कोणीतरी थाप दिली. श्रीमती पाटील यांनी विचारणा केल्यावर, आजी दार उघडा, मी गणेश आहे, असे पलीकडून सांगण्यात आले. एवढ्या रात्री तो आल्यामुळे काही तरी गंभीर बाब असावी, असे वाटून विश्वासाने त्यांनी दार उघडले.
दार उघडताच अज्ञात तरुणाने लागलीच घरात प्रवेश केला. श्रीमती पाटील यांना शिवीगाळ करत त्याने गळा आवळला. यानंतर त्यांच्या गळ्यातील सुमारे अडीच तोळयाची साेनपोत ओढून घेतली. तर सुमारे सात ते आठ ग्रॅम वजनाचे कानातील दागिने या लुटारूने जोरात ओरबाडले. त्यामुळे श्रीमती पाटील यांच्या उजव्या कानाला जखम होऊन रक्तस्राव सुरू झाला. अशा िस्थतीतही या लुटारूने श्रीमती पाटील यांच्या हातातील सोन्याच्या बांगड्या जबरीने काढून घेतल्या. यानंतर दमदाटी करत हा लुटारू अंधारातून पसार झाला.
कानाची जखम सांभाळत श्रीमती पाटील यांनी शेजारी भाडेकरूंना आवाज दिला. त्यामुळे भाडेकरू जागे झाले; परंतु लुटारूने श्रीमती पाटील यांच्या मदतीला कोणी येऊ नये यासाठी अगोदरच त्यांच्या ंघराला बाहेरून कडी लावली होती. रक्तबंबाळ अवस्थेत त्यांनी दरवाजाची कडी खोलल्यानंतर भाडेकरू बाहेर येऊ शकले. तसेच शेजारीही आले. याप्रकरणी सायंकाळी उशिरापर्यंत आझादनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
मुलगा पुरवठा अधिकारी
पोलिसांनीदिलेल्या माहितीनुसार, श्रीमती पाटील यांची मुले बाहेरगावी राहतात. यापैकी मुलगा अनिल पाटील हे नंदुरबार तहसील कार्यालयात पुरवठा अधिकारी आहेत. तर विजय पाटील नामक मुलगा मोराणे या गावी शेती पाहताे.