आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जळगाव शहरात मध्यरात्री चोरट्यांचा धुमाकूळ

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - शहरात चोरट्यांनी गुरुवारी मध्यरात्री चांगलाच धुडगूस घातला. बळीराम पेठेतील संगणक विक्रीचे एक दुकान फोडण्यात चोरटे यशस्वी झाले. तर गांधी मार्केट व फुले मार्केटमधील प्रत्येकी एक दुकान फोडण्याचा प्रयत्न चोरट्यांनी केला. मात्र, त्यात त्यांना यश आले नाही.
मोठ्या प्रमाणात पडणा-या थंडीचा फायदा घेत मध्यरात्री शहरात चोरट्यांनी चांगलाच धुडगूस घातला. शहरातील बळीराम पेठेतील गणेश प्लाझामध्ये भारत आनंदकुमार मतानी (रा. गायत्रीनगर, मेहरूण ) यांच्या मालकीचे कॉम्पुटर वर्ल्ड या दुकानाच्या शटरचे कुलूप तोडून चोरट्यांनी 26 हजार 130 रुपये किंमतीचे चार संगणकांचे मॉनिटर चोरून नेले. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलिस निरीक्षक बी. बी. वायचळे तपास करीत आहेत. महात्मा गांधी मार्केटमध्ये असलेले महावीर ज्वेलर्सचे शटरचे कुलूप तोडून चोरीचा प्रयत्न केला. मात्र, शटरचे कुलूप अर्धवटच तुटल्याने चोरट्यांनी पळ काढला. फुले मार्केट परिसरातील विजय किराणा दुकानातही चोरीचा अयशस्वी प्रयत्न केला.
मध्यरात्री गोंधळ - बळीराम पेठ, गांधी मार्केट व फुले मार्केट हे शहर पोलिस ठाण्यापासून अवघ्या हाकेच्या अंतरावर आहेत. या भागात रात्रभर पोलिसांची गस्त सुरू असते. तरीदेखील चोरट्यांनी धुडगूस घालीत परिसरात चोरीचा अयशस्वी प्रयत्न केल्याने चांगलीच दहशत निर्माण झाली आहे. या भागात मोठ्या प्रमाणावर दुकाने आहेत. फुले मार्केटमध्ये तर दिवसभरात लाखो रुपयांची उलाढाल होते.
संकुलांची सुरक्षा धोक्यात - शहरातील सर्वच व्यापारी संकुलांची सुरक्षा धोक्यात आली आहे. किरकोळ चोरी बरोबरच वस्तूंची चोरी तसेच उपद्रवी व संशयास्पद व्यक्तींचा वावर या परिसरात वाढला आहे. दुकानाच्या बाहेर ठेवलेल्या वस्तूंबरोबरच किरकोळ चोरीच्या घटनांचे प्रमाणही प्रमाणात वाढले आहे. संकुलांनी खासगी सुरक्षा व्यवस्था ठेवण्याबरोबरच पोलिसांनीही या सुरक्षेकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.