आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जळगावमध्ये दुसर्‍या दिवशीही चोरट्यांचा धुमाकूळ

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव: शहरासह परिसरात सलग दुसर्‍या दिवशीही चोरट्यांनी चांगलाच उच्छाद मांडला. गुरुवारी मध्यरात्री एमआयडीसी भागातील औरंगाबाद हायवेला लागून असलेले दोन शॉपिंग कॉम्प्लेक्स टार्गेट केले. यात सुरेशदादा जैन कॉम्प्लेक्समधील एका दुकानात हात मारून 43 हजार रुपयांचा ऐवज लांबविण्यात चोरटे यशस्वी झाले.
सुरेशदादा जैन कॉम्प्लेक्समधील दुकान क्रमांक 35 मधील इंडस्ट्रियल बॅँक अँण्ड फायनान्स सर्व्हिसेस या दुकानाचे शटर तोडून चोरट्यांनी दोन चांदीचे शिक्के, 1 हजार रुपये रोख, 30 हजार रुपये किमतीचे एचपी कंपनीचे लायसन्स अज्ञात चोरट्यांनी लंपास केले. याप्रकरणी दुकानाचे मालक ओमप्रकाश रामचंद्र जोशी (रा.बालाजी पेठ) यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस उपनिरीक्षक किशोर बागुल करीत आहेत.
पुष्कर एन्टरप्राईजेस या दुकानातील विकी रेस्टॉरंटमध्ये दुकानाच्या शटरचे कुलूप तोडून चोरट्यांनी धुडगूस घालत एक लॅपटॉप लंपास केले. या दुकानात संशयास्पद स्थितीत रक्ताचे डागदेखील सापडल्याचे समजते. मात्र, याप्रकरणी सायंकाळपर्यंत पोलिसात कोणीही फिर्याद दिली नसल्याने गुन्हा दाखल झालेला नव्हता. कानळदा येथील गोपाळ पाटील यांच्या शेतातील 500 फूट केबल वायर कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. विद्युत पुरवठय़ासाठी आवश्यक असलेली शेतात ठेवलेली ही वायर चोरट्यांनी लांबविली. याप्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.